‘लाच देणे, लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे’, असा एक फलक कित्येक वर्षांपासून सरकारी कार्यालयांतील नेमक्या टेबलांच्या पाठीशी लटकावलेला आपण पाहत असलो, तरी लाचखोरी आणि भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्याएवढे दुसरे मोठे आव्हान कोणतेच नसेल. त्यामुळेच, लाचलुचपत किंवा भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, म्हणजे, ‘महाराष्ट्राचा अँटी करप्शन ब्यूरो’ (एसीबी) ही यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याची समजूत कधीकाळी रूढ झाली होती. पण अलीकडच्या काळात एसीबीचे रूप पालटले. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाची सूत्रे घेतलेल्या प्रवीण दीक्षित यांनी ‘एसीबी’चे महासंचालक असताना खात्याचे सारे सापळे आणि जाळी, मोठय़ा माशांसाठी राखून ठेवण्याचे धाडसी पाऊल उचलले.
प्रवीण दीक्षित यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खात्याचा चेहरामोहराच बदलून गेला. संगणकाच्या एका क्लिकवर खात्याच्या कारवायांचा तपशील सामान्यांना उपलब्ध होऊ लागला आणि भ्रष्टाचार किंवा लाचलुचपतीच्या रोगावर औषध सापडल्याचे समाधान जनतेच्या चेहऱ्यावर उमटू लागले. गेल्या दोन वर्षांत सरकारी पातळीवरील आणि अगदी सत्ताधीशांच्या मालिकेतील बडय़ा माशांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकश्याही सुरू झाल्या. अशा चौकशीत कोणत्याही दबावाला हे खाते बळी पडले नाही, हे चौकशीच्या प्रत्येक टप्प्यातून पुढे येणाऱ्या माहितीवरून स्पष्ट होत गेले. दीक्षित यांनी खात्याच्या यंत्रणेला आधुनिक चेहरा दिलाच, पण नवे तंत्रज्ञान कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आपलेसे वाटावे यासाठी विशेष प्रयत्नही केले. सामान्य माणसाला भ्रष्टाचाराच्या तक्रारी सहजपणे मोबाइलवरून या खात्याकडे करता याव्यात यासाठी अ‍ॅप विकसित करण्याची अनोखी कल्पना त्यांनी अमलात आणली. गेल्या दोन वर्षांत या खात्याकडे दाखल झालेल्या तक्रारी आणि कारवायांचा चढता आलेख हेच या खात्याच्या यशाचे द्योतक आहे. पोलीस सेवेतील पारदर्शक आणि कणखर, प्रभावी अधिकारी म्हणून प्रवीण दीक्षित यांच्या कारकीर्दीची नोंद आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेत विविध पदांवर काम करताना या लौकिकात त्यांनी सातत्याने भरच घातली आहे. त्यामुळे, आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या लौकिकाची झळाळी आणखी वाढेल व पर्यायाने, ‘भयमुक्त महाराष्ट्रा’चे सामान्य माणसाचे स्वप्न साकार करण्यात त्यांच्या नव्या कारकीर्दीचा हातभारच लागेल, अशी अपेक्षा करावयास हरकत नाही.