14 August 2020

News Flash

प्रीती तनेजा

इराक, जॉर्डन, रवांडा, कोसोवो येथे त्यांनी मानवी हक्क वार्ताहर म्हणून काम केले.

प्रीती तनेजा

भारतीय वंशाच्या तरुण लेखिकांपैकी एक म्हणजे प्रीती तनेजा. त्यांच्या ‘वुइ दॅट आर यंग’ या पुस्तकाला नुकताच डेस्मंड एलियट पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार १० हजार पौंडांचा आहे. लेखकाच्या पहिल्या इंग्रजी कादंबरीकरिता हा पुरस्कार दिला जातो.

तनेजा यांच्या या पहिल्याच पुस्तकातील भाषा, एकाच वेळी विविध विषयांची आंतरिक गुंफण वेगळीच म्हणावी अशी आहे. शेक्सपीअरच्या ‘किंग लियर’ या शोकांतिकेवर आधारित ही कादंबरी असली तरी त्यात आताच्या काळातील पाश्र्वभूमी आहे. यातील सगळा परिप्रेक्ष्य दिल्लीतील आहे. प्रीती तनेजा यांचा जन्म इंग्लंडमधला, आईवडील दोघेही भारतीय. त्यांच्या बालपणातील सगळ्या सुट्टय़ा दिल्लीत गेल्या. इराक, जॉर्डन, रवांडा, कोसोवो येथे त्यांनी मानवी हक्क वार्ताहर म्हणून काम केले. त्यांचे लेखन ‘द गार्डियन’ व ‘ओपन डेमोक्रसी’ यातून प्रसिद्ध झाले आहे. वॉरविक विद्यापीठाच्या त्या स्नातक असून २०१४ मध्ये त्यांच्या ‘कुमकुम मल्होत्रा’ या कादंबरीस गेटहाऊस प्रेस न्यू फिक्शन पुरस्कार मिळाला होता. व्हिज्युअल व्हर्सच्या संपादक व नव्या जगातील तरुण विचारवंत अशी त्यांची ओळख आहे. ‘वुई दॅट आर यंग’ या त्यांच्या कादंबरीत भारतातील राजकारणाबरोबरच नवी दिल्लीपासून काश्मीपर्यंतचा पैस आहे. वसाहतवाद, विषारी पुरुषी मानसिकता, नव्या पिढीचे वयात येणे असे अनेक आयाम गाठणाऱ्या या कादंबरीला झलक प्राइज व फोलिओ प्राइज हे दोन पुरस्कार आधीच मिळाले आहेत. ‘किंग लियर’प्रमाणेच या कादंबरीत तुटलेले संबंध हा मध्यवर्ती विषय ठेवून २०११ मधील भारतामध्ये उभे राहिलेले भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, तणावग्रस्त परिवार यांची पाश्र्वभूमी घेतली आहे. परिवाराचे मुख्य देवराज हे त्यांच्या कंपनीचे नियंत्रण गार्गी, राधा व सीता या तीन मुलींकडे सोपवतात, त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया व नंतरचा घटनाक्रम त्यात पाहण्यासारखा आहे. ही कादंबरी आता अमेरिका व कॅनडातही प्रसिद्ध होणार आहे; पण त्याआधीच फ्रान्स, डेन्मार्क, इस्रायल व जर्मनी या देशांत त्यांच्या भाषांमध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. तनेजा या  इंग्लंडमध्य वंचितांसाठी काम करीत आहेत. ‘लर्निग टुगेदर’च्या माध्यमातून त्या केम्ब्रिज विद्यापीठाच्या जीझस कॉलेजमधील उपक्रमात कैद्यांना लेखनाचे धडे देत आहेत. बेन क्रो यांच्याबरोबर एरा फिल्म्ससाठी काम करताना त्यांनी रवांडातील वांशिक हत्याकांड, नैरोबीच्या झोपडपट्टीतील स्त्रियांचे जीवन, स्थलांतरित कामगारांच्या दर्दभऱ्या कहाण्या त्यांनी जवळून पाहिल्या, त्यामुळे त्यांच्या लेखनाला वास्तव जीवनानुभवांचा स्पर्श असल्याने ते अधिक प्रभावी ठरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2018 1:31 am

Web Title: preti taneja wins desmond elliott prize
Next Stories
1 हार्लन एलिसन
2 विश्वास मंडलिक
3 डॉ. अतुल गावंडे
Just Now!
X