पाश्चिमात्य पॉप व रॉक संगीतात त्याने मोठे नाव कमावले होते, तरुण पिढीत त्याने स्वत:चे स्थान निर्माण केले, तो बहुमुखी प्रतिभेचा कलाकार होता, यशाच्या शिखरावर असताना त्याच्या डोक्यात हवा गेली नाही, परिणामांची तमा न बाळगता नवे प्रयोग तो करीतच राहिला; त्याचे अचानक जाणे रसिकांना चटका लावून गेले. या कलाकाराचे नाव प्रिन्स रॉजर्स नेल्सन. शतकातील प्रतिभावान कलाकार, संगीतातील जागतिक सुपरस्टार ही त्याची ओळख.

त्याचा जन्म मिनासोटातील मिनियापोलिसचा. बालपणापासूनच त्याला अनेक वाद्यांवर हुकमत साध्य होती. वयाच्या सातव्या वर्षी त्याने पहिले गाणे लिहिले. त्याच्या पहिल्या लोकप्रिय अल्बमच्या १० कोटी ध्वनिमुद्रिका विकल्या गेल्या होत्या. संगीताला तंत्रज्ञानाची जोड देताना स्वमदत संगीत संकेतस्थळांची मुहूर्तमेढ रोवली. दैवी देणगी लाभलेला हा हरहुन्नरी कलाकार. पियानो.. गिटार.. बास.. ड्रम्स अशा अनेक वाद्यांच्या मदतीने कला सादर करण्यात तो वाकबगार होता. त्याच्या नावावर ३९ स्टुडिओ अल्बम होते, संगीताच्या मैफलीतही तो रसिकांच्या मनाचा ठाव घेत असे. त्याच्या जीवनातील कलाकृतींचा संच स्पिगेल कंपनी २०१७ मध्ये प्रकाशित करणार होती, पण दुर्दैवाने त्याआधीच प्रिन्सने रसिकांचा निरोप घेतला.

१९७८ मध्ये त्याचा पहिला अल्बम आला तो ‘फॉर यू..’ त्यानंतर ‘प्रिन्स’ (१९७९), ‘डर्टी माइंड’ (१९८०) व ‘कंट्रोव्हर्सी’ (१९८१) हे अल्बमही अल्पावधीत लोकप्रिय ठरले. त्याने कमावलेला ‘वेगळा आवाज’ ही त्याची मुद्रा त्या प्रत्येक अल्बमवर होती. संगीताकडून तो डान्सफ्लोअरवरही तितकाच हिट ठरला. ‘लिटल रेड कॉर्वेट’ या अल्बमने त्याला मुख्य प्रवाहात आणले. त्यानंतर प्रिन्सने वॉर्नर ब्रदर्सना ‘पर्पल रेन’ या चित्रपटासाठी अर्थसाहाय्याची गळ घातली, घर उद्ध्वस्त झालेल्या संगीतकाराच्या जीवनातील लढाईची ती कहाणी. त्यामुळे प्रिन्स घरोघरी पोहोचला. त्यातील ‘व्हेन डव्हज क्राय’ व ‘लेटस गो क्रेझी’ ही गाणी विशेष गाजली. प्रिन्सला १९८५ मध्ये मूळ गाण्यासाठी ऑस्करही मिळाले होते. ‘चेरी मून’ या चित्रपटात त्याने गिगेलोची वादग्रस्त भूमिका केली, नंतर ‘पर्पल रेन’चा सिक्वेल म्हणून ‘ग्राफिटी ब्रीज’ चित्रपटही काढला होता. ‘अल्फाबेट स्ट्रीट’, ‘यू गॉट द लुक’, ‘डायमंड्स अ‍ॅण्ड पर्लस’, ‘गेट ऑफ’, ‘माय नेम इज प्रिन्स’ या एकाहून एक सरस रचना सादर केल्या.  २००७ मध्ये त्याने लंडनमध्ये २१ दिवस कार्यक्रम सादर केले होते, तो एक विक्रम आहे.  ज्या सुमारास मायकेल जॅक्सन व प्रिन्स यांचा उदय होत होता त्या वेळी एमटीव्हीकडे संगीताला आवश्यक असणारा चेहरा नव्हता, ती रिकामी जागा प्रिन्सने हेरली होती. तो संगीतातील शोमन होता.. त्याच्या जाण्यावर केटी पेरीच्या शब्दांत सांगायचे, तर ‘द वर्ल्ड लॉस्ट अ लॉट ऑफ मॅजिक’..