‘परीक्षार्थी’ तयार करणारे शिक्षण आजही, शिकणाऱ्या मुलामुलींना पाठय़पुस्तकांच्या ओझ्याखाली ठेवते. सहज आकलन होईल असे शिक्षण मिळावे आणि शिक्षकांनाही सहज साध्या साधनांनिशी शिकवता यावे ही किमान अपेक्षा. प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांनी १९८५ पासून हे निराळे शिक्षण दिले! त्यांच्या निधनानंतरही, कोल्हापुरातील ‘सृजन आनंद विद्यालया’तील आनंददायी शिक्षणाचा समृद्ध, फुललेला पसारा पाहिल्यास याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही.

लीलाताई या कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या कन्या. २८ मे १९२७ रोजी पुण्यात जन्म झाला. तेथेच बी. एड्. झाल्या. १९४२च्या स्वातंत्र्यसंग्रामात विद्यार्थी म्हणून सहभागी झाल्या, ‘राष्ट्र सेवा दला’तून सामाजिक  कार्यात सक्रिय राहिल्या. कोल्हापुरातील दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्याशी त्यांनी विवाह केला. दोघांचा संसार सुखाने सुरू असताना त्यांचा मुलगा १९७३ साली अपघाती मृत्यू पावला. धीरोदात्त ताई काहीशा विचलित झाल्या होत्या. पण त्यांनी मन खंबीर केले आणि शिक्षण हेच आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.

shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
jalgaon lok sabha latest news in marathi
जळगाव : उन्मेष पाटील यांच्या फलकातून कमळ गायब
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात २८ वर्षे काम केल्यानंतर, प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी शासकीय चौकटीच्या पलीकडील नव्या शिक्षणाचा ओनामा सन १९८५ मध्ये केला. साने गुरुजीप्रणीत ‘आंतरभारती’च्या साह्याने शिक्षणास सर्जनशील व आनंददायी बनवण्यासाठी ‘सृजन आनंद विद्यालया’ची स्थापना त्यांनी केली.  निवृत्तीनंतरचा ‘फंड’ आणि पुरस्कारांच्या रकमेतून  हे कार्य आरंभले. या उपक्रमशीलतेचे शिक्षण क्षेत्रात कमालीचे स्वागत झाले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या त्या पुढच्या पिढीतील कृतिशील अनुयायी ठरल्या. विद्यार्थ्यांना आकलन होईल अशा पद्धतीचे शिक्षण देण्यावर त्यांचा भर होता. या अनुभवांवर आधारित अनेक पुस्तके लिहिल्याने त्या सर्जनशील शिक्षणातील दीपस्तंभ ठरल्या. लीलाताई यांच्या स्वभावाचे दोन वेगळे पैलू होते. चिकित्सावादी बुद्धिवाद, परखडपणा आणि टोकाची शिस्त अशी त्यांची प्रतिमा असे; पण ‘सृआवि’मध्ये शिकवताना त्यांच्यातील मातृहृदय जागे झालेले असे. विषय सोपा करून कसा सांगायचा याची कला त्यांनी विकसित केली होती. साध्या रुमालातून ६० प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, हे उदाहरण! अशा शेकडो उपक्रमशील उदाहरणांची यादीच त्यांच्या संस्थेत पाहायला मिळते. शिक्षणातील प्रयोगशीलतेचा विचारही महाराष्ट्राला शिवला नव्हता त्या काळात त्यांनी प्रयोगशील शिक्षणाची बीजे रोवली. ती पुढे अनेक शिक्षण संस्थांतून अंकुरली, वाढली.

याच वेळी कोल्हापुरातील कितीतरी विविध सामाजिक सेवा संस्थांमध्ये त्या कार्यरत राहिल्या. नर्मदा खोऱ्यातील ‘जीवन शिक्षण शाळे’लाही प्रेरणा दिली. ‘अनुभवातून शिक्षण’ हे गमक असल्याने, मुलांच्या मनातली भुतांची भीती घालवायला शाळेने थेट स्मशानात सहल काढली होती. राजीव गांधी पंतप्रधान असताना लीलाताईंनी त्यांच्याशी शैक्षणिक धोरणाबाबत चर्चा केली. पण त्यांची प्रयोगशीलता नोकरशाहीने हाणून पाडली.

हा अनुभव पाहता आपले शिक्षण त्याच त्या वर्तुळात का फिरत आहे, याचा धडा मिळतो. लीलाताई आता हयात नसल्या तरी, सृजनाचा शोध घेण्याची त्यांची वृत्ती वाढीस लागण्याची गरज प्रकर्षांने अधोरेखित होते.