News Flash

प्रियरंजन दासमुन्शी

केंद्रीय पातळीवर काँग्रेसचे प्रणब मुखर्जी, घनीखान चौधरी असे काही मोजके नेते आपला ठसा उमटवत होते.

प्रियरंजन दासमुन्शी 

 

तीन दशकांहून अधिक काळ कम्युनिस्टांची राजवट असलेल्या प. बंगालमध्ये काँग्रेसची घसरण सुरू झाली ती १९७८ नंतर. सिद्धार्थ शंकर रे यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द अखेरची ठरली. केंद्रीय पातळीवर काँग्रेसचे प्रणब मुखर्जी, घनीखान चौधरी असे काही मोजके नेते आपला ठसा उमटवत होते. काँग्रेसची अवस्था बिकट असतानाही  निवडणुकीत मते मागण्यासाठी त्यांच्याकडे एकमहत्त्वाचा चेहरा होता. तो म्हणजे प्रियरंजन दासमुन्शी यांचा. गतवर्षी प. बंगाल विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्य प्रचारकांच्या यादीत दासमुन्शी यांचे नाव जाणीवपूर्वक ठेवले गेले. ते आठ वर्षे कोमात आहेत, हे सर्वज्ञात असतानाही त्यांचे नाव प्रचारक म्हणून हवेच, हा सोनियांचा आग्रह होता..

याला कारण होते प. बंगालमधील त्यांची लोकप्रियता. दासमुन्शी अत्यंत प्रभावी वक्ते होते. जनसमुदायाशी संवाद साधण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. प्रियादा याच नावाने ते ओळखले जात. आमच्या मतदारसंघात त्यांची सभा ठेवाच असा काँग्रेस उमेदवारांचा आग्रह असायचा. त्या आधी तरुण असताना दासमुन्शी यांनी केलेल्या नानाविध आंदोलनांमुळे दिवंगत इंदिरा गांधी यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. अल्पावधितच सुस्पष्ट आणि तर्ककठोर विचारांमुळे सत्तरच्या दशकात काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या गळ्यातील ते ताईत बनले. अ. भा. काँग्रेस महासमितीत स्थान मिळणे त्या काळी सहजसोपे नव्हते. पण प्रियादांना तेथील दारे पंचविशीतच खुली झाली होती. झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे ७० च्या धशकात मध्ये त्यांना अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. तेव्हा पक्षात बंडाचे वारे वाहू लागले असले तरी दासमुन्शी यांनी इंदिराजींची साथ सोडली नाही. युवक काँग्रेसचे अध्यक्ष असतानाच  ते लोकसभेवर निवडून गेले.

१९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादल्याने दासमुन्शी अस्वस्थ झाले. त्यात नंतर संजय गांधी यांनी राजकारणात जो धुमाकूळ घातला त्याने तर ते पार संतप्त झाले. या दमनशाहीविरोधात त्यांनी बंड पुकारले. पक्षत्याग करून ते आणीबाणीचे कट्टर विरोधक बनले. नंतर काही बडय़ा नेत्यांच्या आग्रहावरून ते १९८२ मध्ये पुन्हा काँग्रेस पक्षात आले. संसदेत आणि संसदेबाहेरही ते पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. दिल्लीत असले तरी राज्यातही त्यांचा तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क होता. इंदिरा गांधी हयात असेपर्यंत प. बंगालमधील विधानसभेच्या तिकीटवाटपात दासमुन्शी यांचे मत आवर्जून विचारात घेतले जात असे. १९८४ मधील निवडणुकांत काँग्रेसने न भूतो..असे यश मिळवले. दासमुन्शी हावडा मतदारसंघातून विजयी झाले. राजीव गांधी यांनी मग त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. प. बंगाल विधानसभेच्या सर्व मतदारसंघांची खडान्खडा माहिती असलेले ते राज्यातील एकमेव नेते होते. म्हणून १९८९ मध्ये त्यांच्यावर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली; पण या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. मग ते पुन्हा केंद्रीय राजकारणात आले. वाजपेयी यांचे सरकार असताना काँग्रेस संसदीय पक्षाचे ते मुख्य प्रतोद होते. २००४ मध्ये यूपीएचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सोनिया गांधी यांनी संसदीय कामकाज आणि माहिती व प्रसारण या दोन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी प्रियादांवर सोपवली. २००८ मध्ये त्यांना हृदयविकाराचा आणि  पाठोपाठ पक्षाघाताचा झटका आला. त्याने मेंदूवर गंभीर परिणाम होऊन ते तब्बल नऊ वर्षे कोमातच गेले. सोमवारी ७२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि काँग्रेसचा प. बंगालमधील बुलंद आवाज कायमचा शांत झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 1:25 am

Web Title: priya ranjan dasmunsi
Next Stories
1 देबजानी घोष
2 डॉ. लता अनंत
3 नजुबाई गावित
Just Now!
X