विद्यापीठ अनुदान आयोगाचे- म्हणजे यूजीसीचे – प्रमुखपद एप्रिल २०१७ पासून रिक्तच होते. इतकेच नव्हे तर देशभरातील विद्यापीठांचे नियमन करणाऱ्या या संस्थेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्हीही पदे तेव्हापासून रिकामी आहेत. या पाश्र्वभूमीवर, प्रा. धीरेन्द्रपाल सिंह यांची यूजीसीचे अध्यक्ष या पदावर गेल्याच शुक्रवारी (२२ डिसेंबर) जाहीर झालेली नेमणूक स्वागतार्ह म्हटली पाहिजे.

या महत्त्वाच्या पदाआधी, जुलै २०१५ पासून प्रा. धीरेन्द्रपाल सिंह यांची नियुक्ती ‘नॅक’चे – म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेचे- संचालक या पदावर झाली होती. बेंगळूरु शहरात मुख्यालय असलेल्या ‘नॅक’मधील हे प्रमुखपद सांभाळूनच प्रा. सिंह दिल्लीतील ‘यूजीसी’चा कारभार पाहणार किंवा कसे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ‘नॅक’मधून प्रा. सिंह यांना ‘यूजीसी’मधील पद मिळणे, ही एक प्रकारे बढती मानली जाते. हे नवे वरिष्ठ पदही विनातक्रार सांभाळण्याची क्षमता प्रा. सिंह यांनी वेळोवेळी सिद्ध केलेली आहे. त्यांचा अध्यापन क्षेत्रातील अनुभव साडेतीन दशकांहून अधिक असून २००४ पासून त्यांनी विविध कुलगुरूपदे सांभाळली आहेत. सागर (मध्य प्रदेश) येथील हरिसिंह गौर विद्यापीठ, बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि इंदूरचे अहल्या विद्यापीठ यांचे ते कुलगुरू होते, त्यांपैकी बनारसमधील त्यांची कारकीर्द (२००८- २०११) विशेष लक्षणीय ठरली. याच कालावधीत बनारस हिंदू विश्वविद्यालयात ‘पर्यावरण व शाश्वत विकास (अध्ययन-संशोधन) संस्थे’ची पायाभरणी तेव्हाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाली, युनेस्कोच्या सहकार्याने या विद्यापीठात ‘शांती व बहुसांस्कृतिक सामंजस्य अध्यापन’ स्थापण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

पर्यावरणशास्त्र हा त्यांचा मूळचा अभ्यासविषय. उत्तर प्रदेशातील शेतकरी कुटुंबात १९५६ साली जन्मलेले धीरेन्द्रपाल इंटपर्यंत तालुक्याच्या गावीच शिकले. आवडत्या विषयात बी.एस्सी. करण्यासाठी त्यांना आग्रा येथील महाविद्यालयात यावे लागले. आग्रा येथे १९७६ ते १९७८ अशी तीन वर्षे काढल्यावर पदव्युत्तर शिक्षणासाठी कुमाऊँच्या गढवाल विद्यापीठात जाण्याखेरीज पर्याय नव्हता. तत्कालीन उत्तर प्रदेशातच (आता उत्तराखंडमध्ये) असलेल्या गढवाल विद्यापीठातूनच त्यांनी पीएच.डी. मिळवली आणि अखेर राज्य सोडून ते उज्जैनच्या विक्रम विद्यापीठात अध्यापनासाठी आले. तेव्हापासून विविध विद्यापीठांत त्यांनी अध्यापनाचा अनुभव घेतला. मात्र ‘पीएसएस केंद्रीय व्यवसाय प्रशिक्षण संस्थे’त त्यांनी प्रशासकीय जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कुलगुरूपदाचा मार्ग प्रशस्त झाला, तो या संस्थेत त्यांनी केलेल्या कामगिरीमुळेच. विशेष म्हणजे विक्रम विद्यापीठ, बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि अहल्यादेवी विद्यापीठ या तिन्ही विद्यापीठांनी प्रा. पाल यांच्या कुलगुरूपदाच्या कारकीर्दीत ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळविला होता.

व्यवसायशिक्षण, पर्यावरणशास्त्र यांसोबतच मूल्यशिक्षणाच्या क्षेत्रात प्रा. सिंह यांनी विविध प्रशासकीय पदे सांभाळताना काम केले आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रकल्पांच्या अभ्यासातून अनेक गोष्टी आपल्याकडे लागू करण्याचा त्यांचा झपाटा लक्षणीय आहे. पर्यावरणशास्त्र अथवा शिक्षण-प्रशासनातील परिषदांच्या निमित्ताने अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वे, डेन्मार्क, चीन, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, थायलंड, मलेशिया असा जगप्रवास त्यांनी केला. देशातील अनेक संस्थांच्या विद्यापरिषदांवर किंवा कार्यकारी मंडळांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले; त्यात बनारस, सागर व इंदूरच्या विद्यापीठांखेरीज अलाहाबाद विद्यापीठ, मिझोरम विद्यापीठ, पंजाबातील केंद्रीय विद्यापीठ, यांचा समावेश आहे. बेंगळूरुच्या भारतीय विज्ञान संस्थेचे ते सन्माननीय सदस्य असून ‘सोसायटी ऑफ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रीसर्च’ या कोलकाता आणि भोपाळ येथील संस्थांचेही सदस्य आहेत. अनेक समित्यांवर त्यांनी काम केलेले आहे.