भाषा ही समाजाला जोडण्याचे महत्त्वाचे साधन असते व त्याच माध्यमातून लोकशाहीची प्रक्रिया नेटाने पुढे नेण्याचे काम करीत असते. हैदराबादच्या सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन लँग्वेजेस या संस्थेने या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. या संस्थेच्या युरोपीय अभ्यास केंद्राचे माजी प्रमुख आणि मूळचे राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. जावीद आलम यांचे नुकतेच निधन झाले.

ते जुन्या हैदराबाद राज्यात १९४३ मध्ये जन्मले, तेथेच अलिया स्कूलमध्ये त्यांचे आधीचे शिक्षण झाले होते. निझामाचे राज्य हैदराबादेत होते. त्यांच्या पूर्वआठवणी या स्वातंत्र्य तसेच तेलंगणातील शेतकरी लढय़ाशी निगडित होत्या. त्यांचे वडील तत्त्वज्ञ होते, तर आई डाव्या राजकारणात सक्रिय होती. त्यामुळे तत्त्वज्ञानाचा वारसा त्यांना होता. आधुनिकता, धर्मनिरपेक्षता, मार्क्‍सवाद व कम्युनिस्ट चळवळीचा तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केला होता. त्याचबरोबर जातव्यवस्था व लोकशाहीचा याच परिप्रेक्ष्यातून वेगळा ताळेबंद मांडला होता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पीएचडी केल्यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून एमए केले. प्रा. जावीद आलम हे युरोपीय अभ्यास विभागातून निवृत्त झाले होते. त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये शिमल्यातील राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणूनही काम केले होते. राजकीय-सामाजिक तत्त्वज्ञान, भारतीय राज्यशास्त्र व पाश्चिमात्य अभ्यास हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय होता. पन्नास अभ्यासलेखांखेरीज त्यांनी अनेक पुस्तके लिहिली व संपादितही केली. ‘डिसेंट अँड डॉमिनेशन- पीझंटस अँड पॉलिटिक्स इंडिया’, ‘लिव्हिंग विथ मॉडर्निटी’ व ‘हू वाँट्स डेमोक्रसी’ ही त्यांची पुस्तके विशेष गाजली. १९८५ मध्ये बुद्धिमंतांचे एक शिष्टमंडळ चीनला गेले होते त्यात त्यांचा समावेश होता व त्यांनी बीजिंग, शांघाय व कँटन येथे चिनी समाजशास्त्रज्ञांशी चर्चाही केली होती. शिमला येथे प्राध्यापक असताना, हिमाचल प्रदेशात ते डाव्या कार्यकर्त्यांत व विचारवंतांत जास्त ओळखले जात. लोकशाही मूल्ये, मानवी हक्क, धर्मनिरपेक्षता व विविध परंपरांचे जतन यासाठी त्यांनी लढाही दिला; म्हणजे त्यांनी केवळ पुस्तकी पांडित्य दाखवले नव्हते. आलम यांनी हिमाचल विद्यापीठात राज्यशास्त्राच्या अध्यापनाचे काम केले व त्यांचा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज या शिमल्यातील संस्थेशी सक्रिय संबंध होता. समाजशास्त्रातील अभ्यासासाठी त्यांना अनेक विद्यापीठांची विद्यावृत्ती मिळाली होती. हैदराबादच्या संस्थेतून २००५ साली निवृत्त झाल्यानंतर ते हैदराबादेतच, मुलाकडे राहत होते. या शहरात वैचारिक वडीलकीचा मान त्यांना लाभला होता व समाजशास्त्रज्ञ म्हणून सुपरिचित होते. अनेक मानसन्मान मिळूनही ते नम्र होते. सामान्य माणसांशी निगडित असलेल्या प्रश्नांवर तसेच घटनात्मक लोकशाही मूल्यांच्या जतनात त्यांची बौद्धिक अस्वस्थता जाणवणारी होती. दलित व महिलांना समाजात समान अधिकार मिळाले पाहिजेत, यासाठी ‘समान संधी आयोगा’च्या जडणघडणीत त्यांनी काम केले होते.