News Flash

प्रा. मुकुंद घैसास

सन १९७१ मध्ये स्थापन झालेल्या नगर शहर सहकारी बँकेच्या संस्थापकीय मंडळात ते होते.

प्रा. मुकुंद घैसास  

अर्थकारण, समाजकारण, राजकारण अशा क्षेत्रांत जवळजवळ ५० वर्षे स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करूनही प्रा. मु. रा. तथा मुकुंद रामचंद्र घैसास यांची खरी ओळख हाडाचा शिक्षक अशीच होती. अर्थकारण, बँकिंगचा गाढा अभ्यासक अशी त्यांची राज्यात ख्याती होती. मात्र त्यांच्यातील अंगभूत शिक्षक कधीच झाकोळला नाही, त्यांनी तो झाकोळू दिला नाही. म्हणूनच केवळ नगरकरच नव्हे तर, अन्यत्रही ज्या ज्या वर्तुळात ते वावरले त्या प्रत्येक ठिकाणी ‘सर’ हीच त्यांची प्रतिमा कायम राहिली, ती पुसली जाऊ शकली नाही. सुरुवातीच्या काळात नगर शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयात काही काळ नोकरी केल्यानंतर सन १९६५ मध्ये नोकरी सोडून घैसास सरांनी नगर शहरातच कॉमर्स इन्स्टिटय़ूट स्थापन करून खासगी क्लासेस सुरू केले.

थोडीथोडकी नव्हे, तब्बल चाळीस वर्षे त्यांनी हे क्लासेस चालवले. या काळात असंख्य चार्टर्ड अकाऊंटंट, कंपनी सेक्रेटरी, प्राध्यापक त्यांच्याकडे घडले. अर्थशास्त्र, बँकिंग, फायनान्स, कॉस्ट अकौंटन्सी, कमर्शियल मॅथेमॅटिक्स, स्टॅटेस्टिक, व्यापारी पत्रव्यवहार आणि आयकर व सर्वसाधारण कायदा अशा वाणिज्य शाखेशी संबंधित महत्त्वाच्या सर्वच विषयांवर घैसास सरांचे प्रभुत्व होते. हीच गोष्ट त्यांना विद्यार्थ्यांकडूनही अपेक्षित होती. त्यामुळेच वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना  केवळ ‘कारकून होऊ नका’, हा त्यांचा पहिला आदेशवजा सल्ला असे. यावर त्यांचे स्वत:चे असे एक ठाम मत म्हणा किंवा तत्त्वज्ञान होते. ते प्रत्येक वर्गात दररोज किमान एकदा तरी एक गोष्ट कायम सांगत- कुठल्याही गल्लीत गेलात आणि आवाज दिला तर, पाच कुत्री आणि दहा बी.कॉम. सहज सापडतील! त्यांच्या असे सांगण्यामागचे मर्म ज्यांना कळाले, ते बी.कॉम.वर न थांबता पुढे  शिक्षणाच्या नवनवीन वाटा चोखााळत अर्थकारणाशी संबंधित विविध क्षेत्रांत खात्रीने चमकले.

सीए, सीएस झालेल्या किंवा होऊ घातलेल्या विद्यार्थ्यांना घैसास सर सनदी सेवेच्या स्पर्धा परीक्षेचा आग्रह करीत, त्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शनही करीत. साठ-सत्तरच्या दशकात त्यांनी ही दूरदृष्टी दाखवली होती. अहमदनगर शहरात नगरपालिका असताना दोनदा ते नगरसेवक होते, विधानसभेची निवडणूकही त्यांनी लढवून पाहिली. सन १९७१ मध्ये स्थापन झालेल्या नगर शहर सहकारी बँकेच्या संस्थापकीय मंडळात ते होते. तेव्हापासून आत्ताही ते बँकेचे संचालक आणि सर्वेसर्वा होते. तब्बल ४५ वर्षे त्यांनी बँकेच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. बँकेशी त्यांचे नाव इतके घट्ट जोडले गेले आहे की, घैसास सरांची बँक, अशीच या बँकेची ओळख सांगितली जाते. सहकार क्षेत्रातील बँकर म्हणून काम करताना एखाद्या नियमाच्या अनुषंगाने वेळप्रसंगी रिझव्‍‌र्ह बँकेशी झगडण्याचीही धमक ते ठेवून होते. घैसास सरांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 3:58 am

Web Title: prof mukund ghaisas
Next Stories
1 डॉ. अर्णब डे
2 व्ही. नारायणसामी
3 फ्रान्सेस अर्नोल्ड
Just Now!
X