जातीय, धार्मिक अभिनिवेश टोक गाठत असताना वंचित, बहुजनच्या हक्कांची जाणीव सवर्णामध्ये करून देणारे समन्वयवादी व्यक्तिमत्त्व अशी प्रा.अविनाश डोळस यांची ओळख. आंबेडकरी विचारांवर निष्ठा आणि चळवळीला आकार देण्याची ताकद असणाऱ्या डोळस यांच्या निधनाने समन्वयाचा एक साकव मोडून पडल्याची भावना मराठवाडय़ासह राज्यभर आहे. मराठी भाषेचे प्राध्यापक म्हणून काम करणारे प्रा. डोळस यांच्या व्यक्तिमत्त्वातील समन्वयाला तोड नव्हती. वैचारिक मांडणीत आणि व्यवहारात कोणतीही तडजोड न करता चळवळीला दिशा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे अचानक  जग सोडून जाणे मनाला चुटपुट लावणारे आहे.

डोळस मराठीचे प्राध्यापक. त्यामुळे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक इंग्रजी ग्रंथ मराठीत आणण्यासाठी मोठे कष्ट घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समितीमध्ये काम करताना त्यांनी अनुवादाच्या कामाला मोठी गती दिली. या क्षेत्रात त्यांनी झोकून देऊन काम केले. अलीकडेच बाबासाहेबांच्या ‘जनता’ या वृत्तपत्राचे पुनप्र्रकाशन करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. महाडच्या सत्याग्रहानंतर झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेची कागदपत्रे, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली बाजू या दस्तऐवजाच्या अनुवादाचे कामही त्यांनी अंगावर घेतले होते. बहुजन आणि वंचिताच्या चळवळीला कसा आकार दिला जावा याचा विचार करताना प्रा. डोळस यांनी या चळवळीसाठी लागणारे साहित्य मराठीत उपलब्ध झाले पाहिजे यासाठी मोठी मेहनत घेतली. हे काम करताना भाषेचा बाज त्यांनी असा काही जपला की त्यांचे असणे सर्वाना हवेहवेसे होते.

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!
Anandacha Shidha closed for two months due to code of conduct Prevention of free goods circulation
‘आनंदाचा शिधा’ दोन महिने बंद; आचारसंहितेमुळे मोफत वस्तू वाटपास प्रतिबंध

अनेक विचारांच्या मंचावर अविनाश डोळस यांची उपस्थिती असे. बहुजनांच्या वेदना, हळवी बाजू किंवा हक्काची जाणीव याची मांडणी करताना वक्ते कधी कडवट होतात हे त्यांनाही कळत नाहीत. पण प्रा. डोळस जेव्हा शोषितांची बाजू मांडत, तेव्हा त्यांच्या मताशी बहुतांशी श्रोते सहमत होत. त्यांच्या लिखाणातही एक शास्त्रीय संशोधनाची वृत्ती दिसून येते. ‘महासंगर’, ‘मराठी दलित कथा’, ‘स्त्री मुक्ती चळवळ एक अवलोकन’, ‘आंबेडकरांचे काल आणि आज’, ‘डॉ. आंबेडकरांचे धर्मातर’, ‘असा एक पाणवठा’, ‘ब्राह्मण समाजाकडून माझ्या अपेक्षा’ असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांचा नाटय़शास्त्रावरही अभ्यास होता. विविध विषयांवर शोधनिबंध लिहिणारे प्रा. डोळस अंतर्यामी कार्यकर्तेपण जपणारे होते. निवडणुकांच्या राजकारणात असूनही त्यातील एकही वाईट बाब त्यांनी स्वीकारली नव्हती. राजकीय कार्यकर्ते त्यांच्यापासून अंतर राखूनच राहायचे. विचाराची लढाई विचारांनी कशी लढावी याचे मर्म जाणून असणारा प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती.