18 October 2019

News Flash

डॉ. नज़मा अख्त़र

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ नज़मा अख्त़र यांची झालेली निवड महत्त्वपूर्ण आहे.

डॉ. नज़मा अख्त़र

देशात उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक विद्यापीठे आणि स्वायत्त संस्था गेल्या ७० वर्षांत स्थापन झाल्या. तरीही वाढत्या लोकसंख्येमुळे त्याही कमी पडू लागल्या. निधीअभावी सरकारलाही नवी विद्यापीठे स्थापन करणे अशक्य होऊ लागल्याने मग खासगी विद्यापीठेही देशात आली. आजमितीस देशात सुमारे ७०० विद्यापीठे आहेत. महिला सबलीकरणाचा उद्घोष सर्वच सत्ताधारी करत असले तरी प्रत्यक्षात संवेदनशील वा जबाबदारीची पदे देताना महिलांचा विचार फारसा होत नाही, असाच अनुभव येतो. देशातील ७०० विद्यापीठांमध्ये कुलगुरूपदी केवळ २० महिला असाव्यात यावरून हेच स्पष्ट होते. या पाश्र्वभूमीवर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ नज़मा अख्त़र यांची झालेली निवड महत्त्वपूर्ण आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेस ९९ वर्षे झाली असून एवढय़ा प्रदीर्घ काळात कुलगुरू होणाऱ्या डॉ. नज़मा या पहिल्या महिला आहेत. मणिपूरच्या राज्यपाल नज्ममा हेपतुल्ला या विद्यापीठाच्या कुलपती आहेत.

नज़मा अख्त़र अलीगढ विद्यापीठात शिकत असताना अतिशय बुद्धिमान विद्यार्थिनी म्हणून त्या ओळखल्या जात. पदव्युत्तर परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक मिळवले. नंतर संशोधनासाठी त्या कुरुक्षेत्र विद्यापीठात गेल्या. तेथून पीएच.डी. मिळवल्यानंतर त्यांना राष्ट्रकुल शिष्यवृत्ती तसेच अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी राष्ट्रीय विज्ञान प्रतिभा शिष्यवृत्ती मिळाली. या अंतर्गत डॉ. अख्त़र यांना ब्रिटनमधील विख्यात वॉर्विक आणि नॉटिंगहॅम विद्यापीठांत अध्ययनाची संधी मिळाली. यामुळे पुढे त्यांना युनेस्को, युनिसेफ, स्पॅनिश इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी यांसारख्या नामवंत संस्थांची कवाडे खुली झाली. या ठिकाणी त्यांनी सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी बजावली. तेथून त्या मायदेशी परतल्या. अलीगढ विद्यापीठात प्राध्यापक तसेच परीक्षा नियंत्रक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. येथून त्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशनल प्लानिंग अ‍ॅण्ड अ‍ॅनमिनिस्ट्रेशन’ या केंद्रीय संस्थेच्या शैक्षणिक प्रशासन या विभागाच्या प्रमुख बनल्या.  इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम निश्चित करण्यातही त्याचे योगदान महत्त्वाचे होते. विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांशी विचारविनिमय करून विद्यार्थ्यांसाठी कोणते नवे अभ्यासक्रम सुरू करता येतील, याला आपण प्राधान्य देणार असल्याचे डॉ. अख्त़र यांनी सांगितले. विद्यापीठाचे शताब्दी वर्ष आता सुरू होणार असून अशा काळात एका महिलेकडे विद्यापीठाचे नेतृत्व येणे ही बाब देशातील उच्चशिक्षण क्षेत्रासाठी दिलासा देणारी आहे.

First Published on April 26, 2019 1:33 am

Web Title: professor najma akhtar profile