X

ऋतभ्रता मुन्शी

लहान असल्यापासून ऋतभ्रता यांच्या घरात गणित व विज्ञानाचेच वातावरण.

ही कथा आहे गणितावरील प्रेमाची. अगदी लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासून या मुलाला चंदरनागोर येथील शाळेतले शिकवणे कंटाळवाणे वाटत होते, त्याला भाषेत रस नव्हता. त्यामुळे त्याने शेवटी गणिताचा ध्यास घेतला. या मुलाचे नाव ऋतभ्रता मुन्शी. त्यांना यंदाचा रामानुजन पुरस्कार जाहीर झाला आहे.

खरे तर विज्ञानाच्या बहुतांश क्षेत्रात गणित हा अविभाज्य असा घटक असतो. अनेकांना त्याचे सौंदर्य जाणवत नाही; पण ज्यांना ते जाणवते त्यांच्यासाठी मग गणित हेच श्रेयस व प्रेयस बनून जाते. ऋतभ्रता अशांपैकी एक. ‘दी इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरॉटिकल फिजिक्स’ या संस्थेकडून रामानुजन पुरस्कार दिला जातो. विकसनशील देशांतील ४५ वयाखालील संशोधक गणितज्ञांची निवड त्यासाठी केली जाते. लहान असल्यापासून ऋतभ्रता यांच्या घरात गणित व विज्ञानाचेच वातावरण. वडिलांच्या निमित्ताने अनेक विज्ञान नियतकालिके घरात येत असत, त्यामुळे त्यांना गणिताची गोडी लागली. त्यांना खेळात रस नव्हता, त्यामुळे ते ही नियतकालिके तासन्तास चाळत बसत. त्या वेळी त्यांना लॉगरिथम, गणिती चिन्हे समजत नव्हती, समजत होते ते फक्त आकडे. त्यातच नववीला असताना ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ हे पुस्तक त्यांच्या हातात पडले व तेथून त्यांचा नंबर थिअरीचा प्रवास सुरू झाला. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्टॅटिस्टिक्समध्ये जेव्हा ते शिकायला गेले, तेव्हा तेथे गणित शिकण्याची सोय नव्हती; पण शिक्षकांनी त्यांची आवड ओळखून टाटा मूलभूत संशोधन संस्थेत पाठवले. त्या काळातच त्यांनी नल स्टेलेनसाझ यांचे प्रमेय सोडवले होते. त्यामुळे गणिताच्या जगात त्यांचे नाव झाले. अजूनही मूळ संख्यांविषयी अनेक कूटप्रश्न आहेत, ते सोडवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. मुन्शी यांना हा पुरस्कार त्यांच्या नंबर थिअरीवरील संशोधनासाठी देण्यात आला आहे. पूर्णाकाचे गुणधर्म हा नंबर थिअरीचा मूळ गाभा आहे. मुन्शी यांनी आधुनिक नंबर थिअरीचा अभ्यास केला असून एल फंक्शन व ऑटोमॉर्फिक फॉम्र्स यावरही संशोधन केले आहे. त्यांनी नंबर थिअरी व गणितीय भूमितीची सांगडही घातली आहे. अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी विद्यावाचस्पती ही पदवी घेतली. नंतर डॉक्टरेटनंतरचे प्रशिक्षण घेऊन ते भारतात परतले. सध्या ते कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट या संस्थेत कार्यरत आहेत. २०१७ मध्ये त्यांना इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनचा गणित विज्ञानाचा पुरस्कार मिळाला होता, तर २०१३ मध्ये बिर्ला सायन्स प्राइझ, २०१५ मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटचे सुवर्णपदक असे अनेक पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत.