सौरचूल जेव्हा प्रसारात नव्हती, तेव्हा तिचा प्रचारप्रसार करणारे आणि सध्या अमेरिकेत हवामान व वातावरण विज्ञानावर १९७० पासून काम करणारे प्रा. वीरभद्रन रामनाथन यांना नुकताच बीबीव्हीए फाऊंडेशनचा ‘फ्रंटियर्स ऑफ नॉलेज’ पुरस्कार जाहीर झाला आहे. रामनाथन हे ‘इंडियन ओशन एक्सपिरिमेंट व अर्थ रॅडिएशन बजेट एक्सपिरिमेंट’ या प्रयोगात सक्रिय होते. ते अमेरिकेच्या विज्ञान अकादमीचे सदस्य आहेत. त्यांचा जन्म मदुराईतला. वयाच्या अकराव्या वर्षी ते बंगळुरूला आले. शाळेत असताना ते शिक्षकांचे म्हणणे कधीच प्रमाणवाक्य म्हणून मान्य न करत स्वत:चे वेगळे म्हणणे मांडत; वैज्ञानिकाचा हा स्थायीभावच. अण्णामलाई विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली व नंतर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेतून एम.एस्सी. झाले. १९७० मध्ये अमेरिकेत जाऊन, ‘स्टेट युनिव्हर्सटिी ऑफ न्यूयॉर्क’मध्ये रॉबर्ट सेस यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. केली. १९७५ मध्ये रामनाथन यांनी शोधलेल्या महाहरितगृह परिणामानुसार, हॅलोकार्बन्स म्हणजे सीएफसीसारख्या रसायनांमुळे तापमानवाढ तुलनेने जास्त होते. हिमालयातील हिमनद्या वितळण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी काही प्रदूषकांचे प्रमाण कमी करण्याचा नवीन दृष्टिकोन मांडला आहे. ‘सूर्य’ नावाचा प्रकल्प राबवून पारंपरिक जैवभाराचा (बायोमास) वापर न करता सौरचुलीचा वापर ग्रामीण भागात वाढवण्याचे मोठे काम त्यांनी केले.
सध्या ते सॅन दिएगोत कॅलिफोíनया विद्यापीठाच्या ‘स्क्रीप्स इन्स्टिटय़ूशन ऑफ ओशनोग्राफी’ या संस्थेचे हवामान व वातावरण विज्ञानाचे विशेष प्राध्यापक आहेत. आपण हवामान बदलास नेहमी कार्बन डायॉक्साइडलाच खलनायक ठरवतो, पण इतर अनेक प्रदूषके अशी आहेत जी तापमानवाढ करीत असतात. विकसनशील देशांतून जी प्रदूषके सोडली जातात, ती कमी केली तर हवेचा दर्जा सुधारून आरोग्य राखले जाऊ शकते व तापमानवाढही रोखता येते, हा इतरांपेक्षा त्यांचा वेगळा दृष्टिकोन. विशेष म्हणजे हवामान संशोधनात वैज्ञानिकांची पुढची पिढी घडवण्यातही त्यांचा वाटा आहे. रामनाथन १९७५ मध्ये अमेरिकेत गेले. त्या वेळी पहिल्यांदा त्यांनी सांगितलेली वेगळी गोष्ट म्हणजे क्लोरोफ्लुरोकार्बन्स हे केवळ ओझोन थर फाटण्यासच जबाबदार नाहीत, तर हरितगृह परिणामातही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कार्बनवरच लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही. १० हजार टन कार्बन डायॉक्साइड जेवढी उष्णता वातावरणात धरून ठेवतो तेवढीच उष्णता १ टन क्लोरोफ्लुरोकार्बन्स वातावरणात धरून ठेवतात हा त्यांचा निष्कर्ष या समस्येकडे पाहण्याची दिशा बदलणारा होता. मिथेन, हायड्रोफ्लुरोकार्बन्स, क्लोरोफ्लुरोकार्बन्स (एचएफसी व सीएफसी) यांसारखी प्रशीतके आपण शीतपेटीत म्हणजे रेफ्रिजरेटरमध्ये वापरत असतो. कार्बनच्या तुलनेत या वायूंचे वातावरणातील प्रमाण केवळ ४५ टक्के असते, पण ते हवामानास जास्त घातक ठरत असतात, हे त्यांचे संशोधन जास्त विशिष्टतेकडे जाणारे आहे.