अनेक सनदी लेखापाल त्यांच्या ‘क्लायंट’चा साकल्याने विचार करून योग्य सल्ला देण्यासाठी नावाजले जातात. तसे बुद्धदेव गुहा नव्हते. म्हणजे- बुद्धदेव गुहा हे पेशाने सनदी लेखापाल होतेच, ते साकल्याने विचार करू शकतात याचे पुरावे तर खंडीभर… पण ज्यांचा विचार बुद्धदेव गुहा करीत ते काही त्यांचे ‘क्लायंट’ नव्हते. ते होते रिजुदा, रिभू असे मनस्वी नायक.  जंगलात हिंडणारे, स्वच्छंद जगणारे, कुठलेही आव्हान स्वीकारायला तयार असणारे ‘गोष्टीतले’ नायक! पण बुद्धदेव गुहांची गोष्ट म्हणजे केवळ साहसकथा नसे. माणसांच्या जगण्याचे, मनुष्यस्वभावाचे आणि सामाजिक अपेक्षांचे ताणेबाणेही त्यात असत. त्यामुळेच, बुद्धदेव गुहा यांच्या निधनवार्तेनंतर महत्त्वाचे बंगाली साहित्यिक गेल्याची भावना व्यक्त झाली.

बंगाली मासिके, पाक्षिके यांतून लघुकादंबऱ्या लिहिण्यापासून बुद्धदेव गुहा यांचा लेखनप्रवास सुरू झाला. त्यांच्या लिखाणाची सहज लक्षात येणारी वैशिष्ट्य दोन. पहिले म्हणजे, पात्रे उभी करण्यात आणि रंगवण्यात त्यांचा हातखंडा होता आणि दुसरे असे की एखाद्या विशिष्ट प्रांतात, भौगोलिक प्रदेशात त्यांची गोष्ट घडायची. हा भोवतालसुद्धा जणू एक पात्र म्हणून त्या कहाणीत असायचा. उदाहरणार्थ त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचा नायक रिजुदा हा विविध जंगलांमध्ये जाऊन तिथल्या रहस्यांचा शोध घेतो. किंवा रिभू हा नायक पूर्व बंगालमधल्या नदीकाठच्या जिल्ह्यांमध्ये मुक्तसंचार करतो. सर्वांत गाजलेल्या आणि इंग्रजीतही अनुवादित झालेल्या ‘मधुकरी’ या कादंबरीत (ही मराठीतली ‘माधुकरी’ नसून ‘मध जमवणे’!) पृथू हा नायक मध्य प्रदेशातल्या कान्हा-किसली अभयारण्यात असतो. हे वाघांचे अभयारण्य आणि नायक स्वत:ला वाघ समजणारा. दिलखुलासपणे जगण्याच्या नादात पत्नीला दुय्यम लेखणारा. पण पत्नी त्याची ‘शिकार’ होणे नाकारते आणि कथेला कलाटणी मिळत जाते.

लोकजीवनाचे थेट चित्रण करण्याऐवजी मोजक्या पात्रांची गोष्ट सांगणारे बुद्धदेव गुहा बहुप्रसवा म्हणावेत असे लेखक. त्यांच्या कादंबऱ्या वा लघुकादंबऱ्यांची संख्या सव्वाशेच्या वर! ते रंजनवादी नव्हते, मानवी आयुष्यातल्या प्रश्नांकडेच तेही पाहात होते, पण त्यांच्या समकालीन बंगाली साहित्यिकांच्या तुलनेत ते रंजकतेकडे अधिक झुकले. साहजिकच, अखिल भारतीय स्तरावरल्या पुरस्कारांनी त्यांना हुलकावण्या दिल्या. पश्चिम बंगालमधले आनंद पुरस्कारासारखे सन्मान मात्र त्यांना मिळाले. या पुरस्कारांपल्याड लोकांच्या मनात आपले स्थान अढळ करण्यात मात्र बुद्धदेव गुहा कमालीचे यशस्वी झाले होते. स्वत:च्या बालपणाविषयी एक आणि तरुणपणाविषयी दुसरी, अशा दोन मालिका त्यांनी लिहिल्या, त्याही लोकप्रिय ठरल्या. मध्यमवर्गीय बंगाली वाचकाच्या तरुणपणीचा दुवाच त्यांच्या जाण्याने निखळला आहे.