भारतात विद्यापीठ पातळीवर अर्थशास्त्र शिकणाऱ्यांना भारतीय अर्थव्यवस्थेची दशा आणि दिशा जाणून घेण्यासाठी त्याविषयीचा अभ्यासक्रम शिकावाच लागतो. तो काही फार आल्हाददायी अनुभव नसतो. मानव्य शाखेतील सर्वाधिक वलयांकित विषयात पदवी घ्यावी म्हणून उत्साहात सुरुवात करावी तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या निराशाजनक, विषमतेने भेसूर वास्तवाचाच परामर्श वारंवार घ्यावा लागतो. हे आकडेवास्तव आणि आभासी जगतात त्याच्या बरोबर विरुद्ध केले जाणारे टोकाचे दावे, अशा गढुळलेल्या परिप्रेक्ष्यात अध्ययन आणि पुढे अध्यापन करण्याचाच कंटाळा आल्यामुळे मास्तरकी सोडून बुद्धदेव दासगुप्ता चित्रपटांकडे वळले. बंगालच्या भूमीत एखादी व्यक्ती चित्रपटाकडे कशी वळली, याविषयीच्या अनेक अद्भुत कहाण्या/आख्यायिकांपैकी ही एक. कलकत्ता फिल्म सोसायटीमध्ये हायस्कूलच्या वयापासूनच जाण्याची संधी मिळणे हे त्यांच्या दृष्टीने मार्गदर्शक आणि भाग्यजनक ठरले. अकिरा कुरोसावा, व्हिटोरियो डे सिका, इंग्मार बर्गमन, रोबेर्तो रोसेलिनी, मिकेलँजेलो अँटोनियोनी, चार्ली चॅपलिन यांचे सिनेमे पाहून या माध्यमाविषयीची बैठक पक्की बसली होती. कवितेविषयी त्यांची आसक्ती चित्रपटांइतकीच होती. पुढे चित्रपट हे माध्यम अभिव्यक्त होण्यासाठी निवडताना त्यांच्या चित्रकृतींमध्ये समीक्षकांना भावकाव्यात्मता दिसली हा योगायोग नसावा. आशय आणि विषयापेक्षाही पडद्यावरील चलचित्रांद्वारे संवाद साधण्याची त्यांची खुबी बहुधा पारंपरिक मातब्बर बंगाली दिग्दर्शकांच्या मांदियाळीत त्यांना न बसवणारी ठरते. परंतु ‘बाघ बहादूर’ किंवा ‘मोंदो मेयेर उपाख्यान’सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या आजूबाजूचे वास्तवच दाखवले जाते असे मराठी किंवा तमीळ प्रेक्षकालाही वाटू शके, हे बुद्धदेव दासगुप्ता यांचे बलस्थान होते.

इतर कोणत्याही प्रस्थापित दिग्दर्शकांपेक्षाही बुद्धदेवांच्या पारितोषिकविजेत्या चित्रपटांची यादी मोठी आहे. वर उल्लेखलेल्या दोन चित्रपटांसह ‘लाल दर्जा’, ‘चराचर’ आणि ‘कालपुरुष’ या आणखी तीन चित्रपटांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ‘उत्तरा’ आणि ‘स्वप्नेर दिन’साठी ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. बंगालीबरोबरच हिंदीमध्येही त्यांनी सहज आणि प्रभावीपणे चित्रपटनिर्मिती केली. पण याचा अर्थ ते केवळ ‘पुरस्कारप्राप्त’ दिग्दर्शक होते का? मुख्य माध्यमप्रवाहात हे बिरुद फार भूषणावह मानले जात नाही. सुदैवाने या गृहीतकाला तितक्याच तुच्छतेने धिक्कारणारे चित्रपट दिग्दर्शकही आपल्याकडे विशेषत: बंगालीमध्ये होऊन गेले. चित्रपटाला सुरुवात, मध्य व शेवट असेल, पण त्याच क्रमाने त्याचे आख्यान सादर होईलच असे नाही. पाश्चिमात्य नवसिनेमा चळवळींत काही दिग्दर्शकांनी आग्रहाने हा विचार मांडला आणि रेटला. ‘तुला काय दिसावे’ यापेक्षा ‘मला काय सांगायचेय’ हे महत्त्वाचे ठरू लागले. प्रवाहाविरोधी पोहण्याच्या त्या धाडसात कित्येक नामशेष झालेही, पण उरल्यासुरल्यांनी चित्रपट माध्यमाला समृद्धच केले. चित्रपटाला आभासी माध्यम ठरवून आभासी विश्वच उभे करणाऱ्यांची मक्तेदारी मध्यंतरी वादातीत होती. ओटीटीसारख्या माध्यमांतरामुळे त्या मक्तेदारीला खीळ बसली म्हणण्यापेक्षा नवा प्रवाह मिळाला. बुद्धदेव दासगुप्तांसारख्या दिग्दर्शकांनी असे प्रवाह फार पूर्वीपासून खणले, जे कालातीत ठरतात. त्यांचे निवर्तणे त्यामुळेही खंतावणारे ठरते.