प्रदूषणावर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानांचा शोध चहूदिशांनी सुरू आहे. यापैकी अब्जांश तंत्रज्ञानाचा (नॅनो टेक्नॉलॉजी) मार्ग वापरून डॉ. अजयन विनू यांनी जीवाश्म-इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करू शकणारा नवीन रासायनिक पदार्थ तयार केला. त्यांना या संशोधनासाठी आता भारत सरकारने २० लाख डॉलर्सचे अनुदान दिले आहे. खरे तर विनू यांनी कार्बन नायट्राईड हा रासायनिक घटक २००५ मध्येच शोधला असून त्याच्या मदतीने इंधन तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडू शकते. जगात अब्जांश तंत्रज्ञानात जे १५ प्रमुख तज्ज्ञ आहेत त्यात डॉ. विनू यांचा समावेश होतो. सूर्यप्रकाश, कार्बन डायॉक्साईड व पाणी यावर वाहने चालू शकतील असे तंत्रज्ञान त्यांनी तयार केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ऑस्ट्रेलियात जाऊन हे संशोधन केल्यानंतर भारत सरकारला त्याबाबत जाग आली व नंतर त्यांना संरक्षण खात्याने अनुदान दिले. कार्बन डायॉक्साईड, सूर्यप्रकाश व पाणी यांच्यापासून इंधन तयार करण्याची कल्पना वेगळी असली तरी ती नवी नाही, पण ती प्रत्यक्षात आणणे कठीण होते; ते काम विनू यांनी केले. विनू हे मूळचे तमिळनाडूतील अरुमनाई या लहान गावचे, सध्या ते न्यूकॅसल विद्यापीठात जागतिक नवप्रवर्तन अध्यासनाचे प्रमुख आहेत. त्यांनी सूर्यप्रकाश व पाणी यांच्या मदतीने कार्बन डायॉक्साईडचे इंधनात रूपांतर केले. हे तंत्रज्ञान सोडियम बॅटरीच्या माध्यमातून विद्युतवाहनांसाठी उपयोगी आहे. यात स्वच्छ ऊर्जाही मिळते व वातावरणातील कार्बन डायॉक्साइडही शोषून घेतला जातो. विनू यांनी कार्बन नायट्राईडचा शोध २००५ मध्ये लावला, तेव्हापासून ते आयआयटी- मुंबई, आयसीटी- मुंबई व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस-बंगळूरु या संस्थांच्या संपर्कात राहिले आहेत. यातून पुढे त्यांनी न्यूकॅसल विद्यापीठात सोडियम आयनवर आधारित विजेऱ्या (बॅटऱ्या) तयार केल्या. त्यातून येत्या तीन ते चार वर्षांत स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे. २०२४-२५ पर्यंत या तंत्रज्ञानातून कार्बन डायॉक्साईड, सूर्यप्रकाश व पाणी यांचा वापर करून हायड्रोजन इंधन तयार करण्याचा त्यांचा इरादा आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांवर आजही भर आहेच, पण त्यासाठी लिथियम बॅटरी लागतात. त्या लिथियमच्या बहुतांश खाणी चीनच्या ताब्यात आहेत. शिवाय लिथियमचे साठेही कधी तरी संपणार! त्यामुळे त्याला पर्याय उभा करणे गरजेचे आहे. विनू यांनी सोडियम आयन बॅटरी तयार केली असून व्यावसायिकदृष्टय़ा हे संशोधन यशस्वी झाले तर तेच उद्याचे तंत्रज्ञान असणार आहे.