इ.स. २००० मध्ये गणितातील दहा कूटप्रश्न जाहीर करण्यात आले होते. यातील कुठलाही कूटप्रश्न सोडवला तर १० लाख डॉलर्सचे बक्षीस ब्रिटनमधील ऑक्सफर्डच्या क्ले मॅथेमटिक्स या संस्थेने लावले होते. या दहा प्रश्नांपैकी एक होता ‘रिमन अभ्युपगम’! गेल्या १६१ वर्षांत हा प्रश्न सोडवता आला नव्हता. तो सोडवण्यात एका भारतीय व्यक्तीस यश आले आहे. त्यांची कूटप्रश्न सोडवण्याची पद्धत योग्य असल्याची शहानिशा गणितज्ञांनी केली; त्यामुळे ते अंतिम पायरीच्या जवळ पोहोचले आहेत. या भारतीय गणितज्ञाचे नाव आहे डॉ. कुमार ईश्वरन. ते गणिती भौतिकशास्त्रज्ञ आहेत. हैदराबाद येथील श्रीनिधी विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेत ईश्वरन काम करतात. आता त्यांचे वय ७४ आहे. त्यामुळे त्यांचे काम सल्ला स्वरूपाचे आहे. हा कूटप्रश्न कसा सोडवला याबाबत जी माहिती ईश्वरन यांनीच दिली आहे ती अशी की, त्यांनी २०१६ मध्ये रिमन अभ्युपगम (गृहीतक) सोडवण्याचा प्रयत्न केला होता. ईश्वरन यांनी हा कूटप्रश्न सोडवण्यासाठी सहा आठवडे खर्ची घातले. नंतर त्यांनी महाजालावर खुल्या परीक्षणासाठी तो ठेवला. अनेक पिढ्यांना हा प्रश्न सोडवता आला नव्हता. काहींनी त्यात नंबर थिअरी म्हणजे सिद्धांताचा वापर करण्याचा प्रयत्न केला. कूटांकनात (क्रिप्टोग्राफी)सुद्धा याचा उपयोग होतो. पण त्याचा शास्त्रीय आधार या कोड्यातून मिळाला आहे. ईश्वरन यांनी मूळ संख्यांवर संशोधन केले व त्या कोड्याच्या सोडवणुकीवर अनेक व्याख्यानेही दिली. आपण १ ते २० दरम्यानच्या मूळ संख्या सांगू शकतो पण जर आपल्याला विचारले की, १ ते १० लाखांपर्यंत किंवा १ ते १० अब्ज या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या असतील, तर आपल्याला सांगता येणार नाही. ईश्वरन यांनी नेमक्या या संख्या शोधून काढण्याचे सूत्र सांगितले. ईश्वरन यांच्या आधी १७७७-१८५५ या काळात महान गणितज्ञ कार्ल फ्रेड्रिक गॉस यांनी मूळ संख्या शोधण्याचा एक ठोकताळा सांगितला होता. त्यानंतर जॉर्ज फ्रेडरिक बेर्नहार्ड रिमन यांनी १८२६-१८६६ या काळात हा प्रश्न सोडवण्याचे सूत्र आणखी सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यात कलन म्हणजे कॅलक्युलसमधील चलांचा वापर केला होता. ईश्वरन यांनी, जे. ई. लिटलवूड यांनी १८८५-१९७७ दरम्यान जे काम केले तेथून हा प्रश्न पुढे सोडवण्यास सुरुवात केली. एखाद्या चलाच्या विशिष्ट निवडलेल्या कार्याचे विश्लेषणात्मक वर्तन पाहिले तर हा प्रश्न सोडवता येईल, असे ईश्वरन यांनी मांडले आहे.