कवी, अतिरेकी, कादंबरीकार, हिंसेचे समर्थन करणारे, निबंध लेखक, फुटिरांचे पाठिंबादार, पत्रकार आणि रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीचा अर्ज भरणारे एक उमेदवार. ही सारी वर्णनपर विशेषणे ज्या एकाच व्यक्तीसाठी वापरली गेली, त्या एडवर्ड (एदुआर्द) लिमोनोव यांचे १७ मार्च रोजी, बुधवारी मॉस्कोत निधन झाले. सोविएत रशियात डाव्या दमनशाहीचे विरोधक, पुढे अमेरिकेत जाऊन तेथील भांडवलशाही स्वप्नातील भगदाडे दाखवून देणारे टीकाकार, मग फ्रान्समधले प्रथितयश रशियन लेखक आणि गेले दशकभर रशियातच राहून पुतिनशाहीशी सातत्याने संघर्ष करणारे राजकीय विरोधक अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या होत्या.

‘लॉस एंजलिस टाइम्स’ने लिमोनोव यांच्या निधनाची बातमी देताना अक्षरश: शेवटच्या एका वाक्यात, ‘राजकारणात कार्यरत असतानाच लिमोनोव यांच्या बऱ्याच कादंबऱ्या, राजकीय प्रचारसाहित्य आणि इतर प्रकारची पुस्तके प्रकाशितही झाली होती’ अशी बोळवण केली आहे. मात्र लिमोनोव यांच्या १८ पुस्तकांची साक्षेपी दखल समकालीन रशियन साहित्याच्या अभ्यासकांना, समीक्षकांना घ्यावीच लागली होती. रशियात १९६६ ते १९७४ पर्यंत ‘क्रोन्क्रीट ग्रुप’ (काँक्रीट हाच अर्थ, परंतु स्पेलिंगात ‘सी’ऐवजी ‘के’ हे इंग्रजी अक्षर वापरणारा) कवींचा गट कार्यरत होता, त्याचे लिमोनोव हे अग्रणी होते याची नोंद ‘विकिपीडिया’वरसुद्धा नाही, ती ‘लोकेटिंग एग्झाइल्ड रायटर्स’ या एल. वाकामिआ लिखित पुस्तकात सापडते.

वयाच्या ३१ व्या वर्षी, १९७४ मध्ये रशिया सोडून लिमोनोव हे रशियन पत्नीसह अमेरिकेस गेले आणि घटस्फोटानंतर एकटेच, निर्धन अवस्थेत न्यू यॉर्कमध्ये राहू लागले. अनेक आफ्रिकन अमेरिकी स्त्रियांशी संग करून गरीब, अमेरिकनांना ही ‘महासत्ता’ कसे वागवते, याचा अनुभवही घेतला. त्यातून ‘आय अ‍ॅम एडी’ ही कादंबरी लिहून झाली, पण १९७७ पासून तयार असलेले ते बाड अनेक प्रकाशकांनी नाकारले. कारण ‘अश्लीलता’. फ्रेंच प्रकाशन संस्थेने ‘एडी’ प्रकाशित केले. रशियात ते खपलेही. त्यानंतर (१९८० पासून) पॅरिसमध्येच राहून त्यांनी कादंबरी लेखन केले. मात्र १९९१ मध्ये युगोस्लाव्हिया, बोस्निया आदींमध्ये यादवी सुरू झाल्यावर त्यांना स्वस्थ बसवेना. रादोवान कार्दझिक या फुटीर नेत्याला त्यांनी साथ दिली. १९९२ नंतर रशियाचेही नागरिकत्व पुन्हा मिळवून, पण फ्रान्समध्ये अधिक काळ घालवून २०११ मध्ये ते मायदेशी स्थिरावले. ‘नॅशनल बोल्शेविक पार्टी’च्या स्थापनेपासून त्यांचा सहभाग होता, पण २००६ मध्ये गॅरी कास्पारॉव्हच्या ‘द अदर रशिया’ चळवळीत या पक्षाचे अस्तित्व विलीन झाले. ते पुन्हा दाखवून देण्यासाठी, काही घातपातही नॅशनल बोल्शेविक अनुयायांनी घडवले होते. साहजिकच, कारवाई लिमोनोव यांच्यावर झाली. त्यानंतर अनेक खरे/खोटे आरोप त्यांच्यावर ठेवून, पुतिनशाहीने लिमोनोव यांना अन्य विरोधकांप्रमाणेच निष्प्रभ केले होते. मात्र या सर्व काळात त्यांच्या लेखणीची धार तेज-तल्लख होती. त्यामुळेच, त्यांच्याविषयी आदर नसणारेही त्यांच्या जीवनकार्याची दखल घेतात.