‘गोव्याचे राजकारण पूर्णत: बदलले- पहिले काही राहिले नाही’ असे म्हणण्याचे अनेकानेक प्रसंग आजवर वारंवार आले आहेतच; पण गोपाळराव मयेकरांच्या निधनामुळे या राजकारणाची उरलीसुरली सांस्कृतिक खूणही हरपली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मूळ विचारधारेशी प्रामाणिक राहणारे माजी आमदार, मंत्री व माजी खासदार म्हणून त्यांचा गोव्याच्या राजकारणाशी संबंध २५ वर्षांपूर्वी होता, हे आता कुणाला आठवणारही नाही कदाचित! कवी व ज्ञानेश्वरीचे भाष्यकार तसेच गोव्यातील मराठीभाषक सांस्कृतिक क्षेत्राचे एक आधारस्तंभ म्हणूनच ते अधिक परिचित होते.  राजकीय अभिनिवेश अजिबात नसलेले बुद्धिजीवी जसे, त्यांच्या बौद्धिक कर्तबगारीसाठीच लक्षात राहतात, तसे गोपाळराव मयेकर होते.

गोपाळरावांचा जन्म मुंबईचा, २३ मार्च १९३४ रोजीचा. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या या तिसऱ्या अपत्याचे शिक्षण बीएपर्यंत झाल्यावर मिळेल ती नोकरी स्वीकारायची, विवाह करून संसाराला लागायचे अशा जीवनचक्राचा अनुभव गोपाळरावांनीही घेतला. पण शाळा-शिक्षकाची नोकरी सांभाळून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि १९६० मध्ये एम.एम. होऊन देवगडच्या महाविद्यालयात ते शिकवू लागले, तेव्हापासून त्यांचे सामाजिक जीवन सुरू झाले. याच महाविद्यालयाचे प्राचार्यपद सोडून ते १९६२ मध्ये -म्हणजे गोवामुक्तीनंतर तीन-चार महिन्यांतच- पणजीच्या ढेम्पे महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख झाले. पुढे बांदेकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी सांभाळले. पिसुर्लेकर- प्रियोळकर अशा गोमंतकीय मराठी अभ्यासकांनी भारलेल्या त्या काळात गोपाळराव ज्ञानेश्वरीकडे आकृष्ट झाले ते कायमचे. ज्ञानेश्वरीचे रसाळ निरूपण करणारी त्यांची व्याख्याने गाजली, त्यावर आधारित एक पुस्तकही आले. स्वत:च्या काव्यलेखनात मात्र प्रेमभावनेची काहीशी बोरकरी वाट गोपाळरावांनी स्वीकारली होती. त्यांच्या ‘स्वप्नमेघ’ (१९८७) या जरा उशिराच आलेल्या संग्रहाला गोवा कला अकादमीचा पुरस्कार मिळाला, पण यापेक्षा समाधान होते ते, यातील ‘चंद्र वाटेवरी एकटा चालतो’सारखी कविता स्वरबद्ध होऊन अनुराधा पौडवालांच्या आवाजात ध्वनिमुद्रिकेवर आल्याचे!

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

गोवा हिन्दू असोसिएशनचे अध्यक्षपद, गोमंतक मराठी साहित्य परिषदेचे (दीर्घकाळ) अध्यक्षपद, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्षपद तसेच दिल्लीच्या ‘साहित्य अकादमी’चे मराठीविषयक सल्लागार-सदस्यपद यांतून त्यांनी सांस्कृतिक जीवनाला आकार दिला. त्या तुलनेत त्यांची राजकीय कारकीर्द अत्यल्प आणि तुकड्यातुकड्यांची म्हणावी अशीच. १९६९ मध्ये ते म्हापशाचे आमदार झाले. दयानंद बांदोडकरांच्या मंत्रिमंडळात त्यांना शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही मिळाले, तेव्हा ते पस्तिशीत होते आणि गोवा हे मंत्रिमंडळ असलेला केंद्रशासित प्रदेश होते. पुढे १९८९च्या निवडणुकीत उत्तर गोव्याचे खासदार होऊन ते नवव्या लोकसभेत गेले. पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने भाषण करताना (डिसेंबर १९८९) अ. र. अंतुले यांच्यासारख्या मुरब्बी सदस्यांचे मुद्देही गोपाळरावांनी चोखपणे खोडून काढले. याच भाषणात ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवू शकणारे हे सरकार आहे’ असा आशावाद व्यक्त करतानाच ‘प्रदेश-उपप्रदेशांच्या आशाआकांक्षा समजून घेणारेच सरकार केंद्रात असायला हवे’ असे सूत्र ठेवून त्यांनी लोकसभेस ‘पसायदान’ ऐकविले! मध्यमवर्गीय बुद्धिजीवी मूल्यभान राजकारणापर्यंत नेणारी वाट त्यांच्या जाण्याने आणखीच धूसर झाली आहे.