सार्वजनिक क्षेत्रात असूनही समभाग बाजारात सूचीबद्ध होणारी पहिली कंपनी, यापेक्षाही देशातील एकमेव  प्रवासी वाहन निर्मिती कंपनी अशी ‘मारुती उद्योग लिमिटेड’ची (आता मारुती सुझुकी) ओळख.  १९९९ ते २००७ असा दीर्घ काळ या  कंपनीचे व्यवस्थाआर्थिकय संचालक असणारे जगदीश खट्टर यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले, तेव्हा ‘बाबू’ ते ‘कॉर्पोरेट बॉस’ हा त्यांचा प्रवास अनेकांना आठवला असेल!   उद्यमशील कुटुंबात १९४२ मध्ये जन्मलेले  जगदीश खट्टर यांना व्यवसायाचे बाळकडू अगदी लहान वयातच मिळाले होते. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजातून कला शाखेतील पदवीनंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. भारतीय प्रशासकीय सेवेतील जवळपास तीन दशकांचा त्यांना अनुभव होता. उत्तर प्रदेश केडरमधील भारतीय प्रशासक सेवेतील अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. त्या राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाचे ते अध्यक्षही होते. उत्तर प्रदेशच्या अनेक सरकारी कं पन्यांचे, महामंडळाचे प्रमुखपद त्यांनी भूषविले. १९८८ मध्ये थेट केंद्रीय पोलाद मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून रुजू झाले.

मारुतीत त्यांचा प्रवेश विशेष अधिकारी म्हणून १९९२ मध्ये झाला. जुलै १९९३ मध्ये ते विपणन विभागाचे संचालक झाले. कंपनीवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून १९९९ मध्ये त्यांची मारुतीचे व्यवस्थाआर्थिकय संचालक म्हणून नियुक्ती झाली. मे २००० मध्ये मारुतीमधील भागीदार सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर नियुक्त झाले. २००७ मधील निवृत्तीपर्यंत ते तेथे होते. मात्र मारुतीतील जपानी सुझुकी कंपनीच्या भागीदारी हिश्शाच्या वाढप्रसंगी त्यांचे उद्यमशील कसब २००२ मध्ये उपयोगी आले. विदेशी गुंतवणुकीच्या साह्याने भारतीय, तीही सरकारी कंपनी उभी करण्याची व्यावसायिक-प्रशासकीय मिसळ परिणामी खट्टर यांच्याच नेतृत्वामुळे यशस्वी ठरली. मारुतीतील २००७ मधील निवृत्तीनंतर त्यांनी याच क्षेत्राशी संबंधित कारनेशन ऑटो ही कंपनी सुरू केली, तीत विप्रोच्या अझीम प्रेमजींसारख्या उद्योगपतींची गुंतवणूक होती. ‘ओएलएक्स’सारखा तंत्रस्नेही मंच येण्यापूर्वीच त्यांनी जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचे हे प्रत्यक्ष व्यासपीठ सुरू केले होते. मात्र आयुष्यातील शेवटच्या, स्वत:च्या कं पनीच्या बदनामीचे ते निमित्त ठरले. पंजाब नॅशनल बँकेच्या ११० कोटी रुपयांच्या नुकसानासाठी त्यांच्या कारनेशन ऑटोला जबाबदार धरत सीबीआयने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले.  तपासाअंती ते निर्दोष सुटलेही, पण  एक व्यावसायिक, नागरी सेवेतील प्रशासक आणि पुन्हा उद्योजक असा यशस्वी प्रवास अनुभवलेल्या खट्टर यांच्या कारकीर्दीला शेवटच्या टप्प्यात गालबोट लागले.