समाजातील दुहीचा काच ज्यांना बसत नसतो, किंबहुना झाला तर फायदाच होत असतो, असे बलवत्तर समूह या दुहीची चिकित्सा  खुल्या मनाने ऐकण्यास तयार नसतात. मग काहीजणांनी अशी चिकित्सा केलीच, तरी चिकित्सा करणारेच दुही माजवत आहेत, असा उफराटा आरोप करण्यास हेच समूह निर्लज्जपणे पुढे येतात! ‘काळे आणि गोरे हा भेद अमेरिकेत मिटला वगैरे देखावे झूट असून,  हा भेदभाव अद्यापही कायम आहे’ असे साधार, सप्रमाण आणि संशोधनांती सांगणारे जेम्स लिओवेन यांच्यावरही असाच उफराटा आरोप झाला आणि त्यांची उपेक्षाही त्यांच्याच मिसिसिपी राज्यात झाली. परंतु १९ ऑगस्ट रोजी लिओवेन यांचे निधन झाल्याची वार्ता अमेरिकेत ऑगस्टअखेर माहीत झाली, त्यानंतर मात्र त्यांच्या कार्याची उचित दखल अनेक प्रकाशनांनी घेतली!

‘लाइज माय टीचर टोल्ड मी : एव्हरीथिंग युअर अमेरिकन हिस्टरी टेक्टबुक गॉट राँग’ हे त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या पुस्तकाचे नाव. ते पुस्तक १९९५ सालचे, म्हणजे लिओवेन ५३ वर्षांचे असताना प्रकाशित झालेले. मात्र वर्णभेद हा त्यांचा अभ्यासविषय आधीपासूनचाच. १९७४ साली, म्हणजे ३२ वर्षांचे असताना ‘मिसिसिपी- कॉन्फ्लिक्ट अ‍ॅण्ड चेंज’ हे पुस्तक त्यांनी लिहिले, त्यास अभ्यासपुस्तक म्हणून मान्यताही मिळाली. अध्यापनाचा दीर्घ अनुभव गाठीशी असणाऱ्या लिओवेन यांना,  समाजशास्त्र व इतिहास या अभ्यासक्षेत्रांचा आंतरसंबंध शिक्षणामध्ये कसा येतो, याविषयी कुतूहल होते. इतिहास शिकवण्याचे सामाजिक परिणाम कायकाय घडतात, याविषयी संशोधनपूर्वक निष्कर्ष काढण्याची त्यांची तयारी होती. पण इतिहास-अध्यापनातला खोटेपणा उघड करणारे १९९५ सालचे पुस्तक प्रकाशित झाल्यावर मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. हे पुस्तक लोकप्रिय झाले, वर्णभेदविरोधी चळवळी वा कार्यकर्ते यांना एक वैचारिक आधार त्या पुस्तकाने पुरवला, पण विद्यापीठांनी ते दुर्लक्षित केले किंवा मिसिसिपी विद्यापीठाने तर सरळच नाकारले. त्यामुळे खचून न जाता लिओवेन लिहीत राहिले. यातून १९९५ सालीच, ‘टीचिंग व्हॉट रिअली हॅपन्ड’ हे पुस्तक सिद्ध झाले. ही दोन्ही पुस्तके, स्मिथसोनियन संस्थेच्या पाठ्यवृत्तीमुळे त्यांना हाताळण्यास मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे लिहिली गेली होती. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांत वर्णभेद तीव्र आहे, हे तर उघडच. तेथील आफ्रिकन अमेरिकनांनी सनदशीरपणे निवडणूक लढून कायदे बदलण्याची तयारीही दाखवली, पण एकीकडे कू क्लक्स क्लॅनसारख्या संघटना भ्याड हल्ले करीत असताना, दुसरीकडे अगदी डेमोक्रॅटिक पक्षानेही कचखाऊपणे उमेदवाऱ्या नाकारल्या, हे लिओवेन यांनी स्पष्टपणे सांगितले.

लिओवेन यांचे पुढले अभ्यास हे चिनी वा अन्य वर्णीय समूह आणि त्यांना आजही मिळणारी वागणूक यांविषयी होते. त्यांचे ‘सनडाउन टाउन्स’ हे- गौरेतरांना रात्री शहरात येण्यास अघोषित बंदीच करण्याचे प्रकार उघड करणारे- पुस्तक भूतकाळ सांगणारे होते, पण त्यावर प्रतिक्रिया आल्या त्या ‘आजही स्थिती फार निराळी नाही’अशा! मग इंटरनेटच्या आधारे त्यांनी असल्या प्रवृत्ती कुठेकुठे टिकून आहेत याचा अभ्यास केला तर हजाराहून अधिक ‘सनडाउन टाउन्स’ २०१० नंतर समोर आली! संशोधकांची उत्तम फळी लिओवेन यांनी उभारली, ती त्यांचे काम पुढे नेईल.