News Flash

डॉ. जेन गुडाल

जेन गुडाल यांनी चिम्पान्झींवर संशोधन करताना जी आत्मीयता व एकाग्रता दाखवली ती पाहता या पुरस्कारासाठी गुडाल यांची निवड समर्पक ठरते.

वानरवैज्ञानिक जेन गुडाल यांनी चिम्पान्झींचे निरीक्षण गेली कैक दशके अतिशय आत्मीयतेने केले, अनेक पुस्तके लिहून जनजागृती केली, तसेच चिम्पान्झींच्या संवर्धनासाठी त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या या बहुविध कार्यासाठी त्यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘टेम्पलटन’ पुरस्कार जाहीर झाला आहे. टेम्पलटन पुरस्कार विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या वैज्ञानिकांना दिला जातो. त्यांनी पर्यावरण विषयावरही अनेक प्रश्न हिरिरीने मांडले. जेन गुडाल यांनी चिम्पान्झींवर संशोधन करताना जी आत्मीयता व एकाग्रता दाखवली ती पाहता या पुरस्कारासाठी गुडाल यांची निवड समर्पक ठरते. जेन गुडाल यांनी हाती घेतलेला विषय ज्याप्रकारे हाताळला ती एक आध्यात्मिक साधनाच होती, फक्त त्याला वैज्ञानिक तेचा बाज होता. गुडाल यांचा जन्म १९३४ मध्ये लंडन येथे झाला, नंतर त्या १९५७ मध्ये जेव्हा केनियाला गेल्या तेव्हा त्यांना प्राणिसृष्टीची प्राथमिक ओळख झाली. मानववंशशास्त्रज्ञ व जीवाश्मशास्त्रज्ञ लुई लिकी यांच्या निमंत्रणावरून त्यांनी १९६० मध्ये चिम्पान्झींवर संशोधन सुरू केले. चिम्पाझींच्या टांझानियातील अधिवासात जाऊन केलेल्या संशोधनाने वानरविज्ञानात क्रांतिकारक भर पडली. चिम्पान्झी वेगवेगळी साधने बनवू शकतातच, शिवाय त्यांचे असे व्यक्तिमत्त्व असते. प्राण्यांच्या बुद्धिमत्तेबाबत त्यांच्या इतके संशोधन कुणी केले नाही. या वेगळ्या विषयात संशोधन करताना तरुण वैज्ञानिकांनी शिकावे ते एखाद्या विषयाला समर्पण कसे करावे हे. गेल्या वर्षी हा पुरस्कार अमेरिकेतील ‘ह््यूमन जिनोम प्रोजेक्ट’चे डॉ. फ्रान्सिस कॉलिन्स यांना मिळाला होता. त्याआधीच्या मानक ऱ्यांत मदर तेरेसा, दलाई लामा, आर्चबिशप डेस्मंड टूटू यांचाही समावेश आहे. गुडाल यांनी त्यांच्या मुलाखतीत असे म्हटले आहे, की निसर्गाला जाणून घेण्यासाठी तासन्तास जंगलात बसून केलेल्या चिंतनाचा हा सन्मान आहे. जेव्हा एखादी प्रजाती नष्ट होते तेव्हा त्यात आपल्याला काही वाटत नाही, पण निसर्गाच्या दृष्टीने एका रंगचित्रावरचा तो ओरखडा परिसंस्थेला विद्रूप करतो. निसर्ग समजून घेताना आपले माणूसपण विसरून त्याच्याशी तद्रूप होणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांचे मत आहे.

जेन गुडाल यांनी १९७७ मध्ये ‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट’ ही संस्था चिम्पान्झींच्या संरक्षण व अभ्यासासाठी स्थापन केली. त्यांनी अनेक स्थानिक मानवी जमातींचे कल्याणही साधले. निसर्ग व मानव यांच्यातील एक दुवा म्हणून काम करताना त्यांनी ६५ देशात पर्यावरण प्रकल्प राबवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 12:00 am

Web Title: profile jane goodall akp 94
Next Stories
1 युआन लाँगपिंग
2 स्क्वाड्रन लीडर (निवृत्त)  अनिल भल्ला
3 तंजावुर व्ही. शंकर अय्यर
Just Now!
X