‘लाडकी बाहुली होती माझी एक.. मिळणार तशी ना शोधून दुसऱ्या लाख..’ कवयित्री शांता शेळके यांच्या या ओळी मुलांच्या मनातील खेळण्यांचे भावविश्व उलगडून सांगतात. आजच्या काळात खेळण्यांचे महत्त्व कमी होत असले तरी पूर्ण संपलेले नाही. पाश्चात्त्य जगात ‘मेकॅनो’सारख्या खेळण्यात माणूस आणि त्याचेही सुटे भाग आणून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे जेन्स नेगार्ड नडसन यांचे निधन त्यामुळेच अनेकांना धक्कादायक वाटल्याशिवाय राहणार नाही.

नडसन हे खेळण्यांचे डिझायनर म्हणून प्रसिद्ध होते. ‘लेगो’ ही आज जगप्रसिद्ध असलेली खेळणी-कंपनी डेन्मार्कमधील ओले किर्क ख्रिस्टियान्सेन यांनी १९१६ मध्ये लाकडी ठोकळय़ांची खेळणी बनविणारा कुटिरोद्योग म्हणून स्थापली आणि लोकप्रियही केली. या ख्रिस्टियान्सेन यांचे निधन १९५८ मध्ये झाले. त्यानंतर काही वर्षांनी ‘लेगो माणूस’ अवतरला.. त्याचे जनक होते जेन्स नडसन!

लेगो या विविध आकाराच्या लाकडी ठोकळ्यांपासून विविध आकार-प्रकार आधीही तयार करता येत होतेच, पण या ठोकळ्यांपासून बनलेले गाडी, बंगला, शाळेची इमारत, विमान- सारेच कसे निर्मनुष्य भासे.. आता नेगार्ड यांनी छोटी-छोटी माणसे सुटय़ा भागांत तयार केली. हे करताना त्यांनी मुलांच्या शारीरिक सुरक्षिततेचा आणि मानसिक वाढीचाही विचार केला. माणूस मग तो असाच असला पाहिजे, अशी जर एकदा समजूत झाली तर ती घातक असते. नेमकी हीच गोष्ट त्यांनी माणसांची ही बहुरूपी फौज उभी करून टाळली होती. एकमेकात ठोकळे बसवून माणसे तयार करण्याची ही संकल्पना लेगो या डॅनिश कंपनीने पेटंट रूपात जतन केली. या खेळण्यातील हात, पाय व छाती वेगवेगळ्या ठोकळ्यांना जुळणारी असल्याने वेगवेगळी माणसे मुलांच्या भावविश्वातून जन्म घेत असत.

नडसन हे १९६८ मध्ये लेगो कंपनीत आले व अखेपर्यंत त्यांनी तेथेच काम केले. नंतरच्या काळात त्यांनी लेगो लँड व लेगो कॅसल, लेगो स्पेस ही जुळवण्याची खेळणी तयार केली. नडसन यांचे वैशिष्टय़ असे की, त्यांची ही छोटी माणसे लाखो मुलांची आवडती बनली. या माणसांचा रंग पिवळसर ठेवण्याचे कारणही वेगळे होते. ते म्हणजे सर्व वंश व पाश्र्वभूमीच्या मुलांचे त्यांच्याशी नाते जुळावे. लेगो माणसांची निर्मिती करण्यास नडसन यांना आठ वर्षे लागली होती. १९७४ मध्ये त्यांनी असे पहिले ठोकळे तयार केले. लेगोच्या संकेतस्थळावर म्हटल्याप्रमाणे हा प्रवास निरंतर चालू राहिला. त्यातून आजपर्यंत अशी ७.८ अब्ज खेळणी तयार करण्यात आली आहेत. मुलांना आजच्या काळात गाडय़ा, विमाने अशी खेळणी जास्त आवडतात. तसा प्रयत्न त्यांनीही मोटारगाडी व विद्युत रेल्वेगाडय़ा तयार करून केला होता, पण नंतर त्यांनी माणसाशी नाते सांगणारी लेगो मेन ही मालिका सादर केली. स्पेस मालिकेत त्यांनी ३५८ रॉकेट तळ व ३६७ चांद्रयान अवतरण संच तयार केले होते. नडसन यांच्या निधनामुळे, जगाने एक चांगला खेळिया गमावला आहे.