‘आपण निसर्गाकडे जातो आणि त्याच्या अमर्याद साधनांची लूट करतो. गाईचे कृत्रिम रेतन आम्ही हक्काने घडवून आणतो. मग तिचे वासरू पळवतो. तिच्या हंबरडय़ांकडे दुर्लक्ष करतो. तिच्या वासरासाठीच असलेले दूध हडप करून आम्ही कॉफीत वा नाश्त्यासाठी वापरतो..’  हे शब्द कुठल्या पाळीव पशुसंवर्धन किंवा निसर्गसंवर्धन परिषदेतले नाहीत. ते ऑस्कर सोहळ्यातले होते आणि अशा ठिकाणी ते ठणकावून सांगणारी व्यक्ती होती व्हाकिन फिनिक्स. ९२व्या ऑस्कर वितरण सोहळ्यात व्हाकिनला ‘जोकर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे ऑस्कर जाहीर झाले. ते स्वीकारताना ज्या अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर त्याने भाष्य केले, त्यांपैकी हा एक. समता, सर्वसमावेशकता, निसर्गसंवर्धन या विषयांवर बोलण्यासाठी व्हाकिन गेली काही वर्षे पुरस्कार सोहळ्यांचे व्यासपीठ बिनदिक्कतपणे वापरत आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात अभिनयाचे पारितोषिक स्वीकारताना त्याने हवामान बदलाचा मुद्दा उपस्थित केला आणि ‘प्रायव्हेट जेट वापरायचे बंद करा ना’ असे तेथील वलयांकित समुदायाला सुनावले. व्हाकिन मूळचा प्युटरेरिकन. त्यामुळेच इंग्रजी स्पेलिंगनुसार जोआकिन असे त्याचे नाव असले, तरी त्याचे ‘व्हाकिन’ असे स्पॅनिशीकरण त्याने पसंत आणि रूढही केले. त्याच्या अनेक भूमिका मानसिकदृष्टय़ा विचलित पात्रांच्या असतात. ‘जोकर’ही याला अपवाद नाही. या भूमिकेसाठी त्याने वजन घटवले. विशिष्ट प्रकारे हसण्यासाठी काही मानसिक विकारांचा अभ्यास केला. जोकर/ विदूषक या पात्राचे बहुतेक चित्रपटांमध्ये शोकान्तीकरण केले जाते. तो दोष मान्य करूनही ‘जोकर’मधील साचेबद्ध भूमिकेतील व्हाकिनच्या उत्कट अभिनयाचे कौतुक करावे लागेल. त्याला यापूर्वी तीनदा ऑस्कर नामांकन मिळाले होते. पण ऑस्कर पहिल्यांदाच मिळाले. पण व्हाकिनसारख्या अभिनेत्यांची हॉलीवूडमधील उपस्थिती ही सध्याच्या अस्थिर आणि अस्वस्थ टप्प्यावर एक सामाजिक गरज बनून जाते. त्या पार्श्वभूमीवरव्हाकिनची वाटचाल तपासावी लागेल. ब्रिटिश फिल्म अँड टेलिव्हिजन अ‍ॅकॅडमी (बाफ्टा) या आणखी एका प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात व्हाकिन ‘पद्धतशीर वर्णद्वेषा’वर बोट ठेवतो. कारण सलग दोन वर्षे बाफ्टाने गौरेतर अभिनेत्री/ अभिनेत्याला नामांकन दिलेले नव्हते.  ऑस्कर सोहळ्यातील भाषणात लिंगभेद, समलिंगींचे हक्क, वर्णभेद, भूमिपुत्रांचे हक्क वा पशूंचे हक्क यांविषयी बोलून न थांबता तो म्हणाला, ‘‘हा संघर्ष अशा विचाराच्या विरोधात आहे जो एक धर्म, एक वर्ण, एक देश किंवा एका प्रजातीला इतरांवर हुकमत गाजवण्याचा, त्यांचे शोषण करण्याचा हक्क आहे असे मानतो.’’ व्हाकिनचे हे शब्द त्याच्या सखोल शहाणिवेचा पुरावा सादर करतात.