सध्या करोनाचा संसर्ग जगभरात सुरू आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे. ‘आम्ही लशीच्या चाचण्याही आरंभल्या’ वगैरे बातम्या अमेरिकेहूनच येत असल्या तरी अन्यही अनेक देशांनी हे संशोधन हाती घेतले आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने करोनाची गंभीर दखल घेऊन लस तयार करण्यासाठी ‘युरोपीय कामगिरी दला’ची स्थापना केली आहे. त्यात मूळचे भारतीय वैज्ञानिक महादेश प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे. ते मूळचे कर्नाटकातील अलकालगुडचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण याच गावातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेत झाले. त्यांनी हासन येथून सरकारी विज्ञान महाविद्यालयातून बीएस्सी, तर म्हैसूर विद्यापीठातून जैवरसायनशास्त्रात एमएस्सी पदवी घेतली. सध्या ते बेल्जियममधील लिवेन विद्यापीठाच्या ‘रेगा इन्स्टिटय़ूट व्हायरॉलॉजी अ‍ॅण्ड केमोथेरपी’ या संस्थेत वैज्ञानिक आहेत. लिंकोपिंग विद्यापीठाने प्रसाद यांचे नाव जागतिक लस संशोधनासाठी पाठवले होते. त्यांना २०१६ मध्ये विज्ञान व अभियांत्रिकी संशोधनातील तरुण वैज्ञानिक पुरस्कार मिळाला होता. जर्मनी, अमेरिका, बेल्जियम, स्वीडन या देशांनी त्यांना विद्यावृत्ती व पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्यांनी एकूण १६ संशोधन निबंध सादर केले असून त्यात जैवरसायनशास्त्र, विषाणूशास्त्र, मूलपेशी जीवशास्त्र यांचा समावेश आहे. युरोपीय मंडळाने त्यांना प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांबाबतचे तज्ज्ञ म्हणून मान्यता दिलेली आहे. प्रसाद यांचे बंधू कोमल कुमार हे फिनलंडमध्ये वैज्ञानिक असून ते कर्करोगावरील औषधाचा शोध घेत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकात आपल्या मुलाला स्थान मिळाल्याचा त्यांची आई रत्नाम्मा यांना सार्थ अभिमान आहे. एकंदर दहा वैज्ञानिक या गटात काम करीत असून हा गट जी लस तयार करणार आहे ती आंतरजनुकीय दुहेरी लक्ष्य गाठणारी आहे. गेले दोन महिने हे काम सुरू असले तरी आणखीही प्रयोग करावे लागणार आहेत कारण लस शेवटी माणसाला टोचायची असते. सहा महिन्यांत या संभाव्य लशीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या कोविद- १९ विषाणूवर विशिष्ट औषधे नसली तरी एड्सवरील औषधांच्या मदतीने तो बरा केला जात आहे. लशीशिवाय औषधांच्या १५ हजार रेणूंवर प्रयोग सुरू आहेत. खासगी कंपन्यांची, लस शोधून नफेखोरीसाठी स्पर्धा सुरू असताना महादेश प्रसाद यांनी वेगळा मार्ग निवडला आहे.