माझ्यातला लेखक आता मेला.. मी यापुढे शिक्षक म्हणून जगणार असे सांगून लेखनसंन्यास घेतलेले तमिळ साहित्यिक पेरुमल मुरुगन यांना पाचव्या आंतरराष्ट्रीय भारतीय भाषा महोत्सवाचा ‘समन्वय भाषा सन्मान’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजाने जरी लेखकाला मारण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तारणारे, त्याच्यातील साहित्यगुण ओळखणारे लोकही अजून आहेत हे त्यांच्या या निवडीतून दिसून आले आहे. तमिळ ही फार जुनी भाषा मानली जाते व त्यातील साहित्य परंपरेला समृद्ध करणाऱ्या लेखकाचा हा सन्मान अजूनही सारे काही संपलेले नाही असा दिलासा देणारा आहे.
तामिळनाडूत जात व गुलामीच्या प्रवृत्तीतून लोकांचा छळ केला गेला, तो त्यांनी साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला होता. ज्या कादंबरीमुळे त्यांनी लेखन सोडले त्याच ‘मधोरुभगान’ या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. मुरुगन हे तमिळ भाषेतील एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत. त्यांचा जन्म १९६६ मध्ये झाला. नमक्कल येथे ते गव्हर्नमेंट आर्ट्स कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांनी एकूण नऊ कादंबऱ्या व चार कथासंग्रह लिहिले आहेत, ते कवीही आहेत. त्यांच्या ‘सिझन्स ऑफ द पाम’, ‘करंट शो’ व ‘वन पार्ट वुमन’ (मधोरुभगान) या कादंबऱ्या इंग्रजीतही आल्या आहेत. मुरुगन हे शिक्षक आहेत व त्यांच्या ‘मधोरुभगान’ या कादंबरीवर काही हिंदुत्ववादी प्रतिगाम्यांनी टीका केल्याने जानेवारी महिन्यात वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी लेखनसंन्यास घेतला. त्यांच्या या कादंबरीविरोधात कोंगू वेल्लाळ गौडर समुदायाने आंदोलन केले. समाजातील महिलांचा व देवतांचा अपमान झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. या कादंबरीत एका निपुत्रिक जोडप्याचे वर्णन असून त्यातील पत्नी गर्भवती होत नसते, मग ती एका हिंदू रथ महोत्सवात जाते कारण त्या महोत्सवात एक दिवसाकरिता पुरुष व स्त्री यांना संमतीने शरीरसंबंधांना परवानगी असते. नंतर समाज या जोडप्याला दूषणे देतो, वेगळे करण्याचा प्रयत्न करतो, असे वर्णन आहे. त्यामुळे विशिष्ट जातीच्या लोकांना त्यात अपमान वाटला. त्यात काही गावे व ठिकाणांचे उल्लेख असल्याने त्यांनी लेखनास आक्षेप घेतला. पुस्तकाच्या निषेधानंतर मुरुगन यांनी वैतागून लोकांना आपली पुस्तके जाळून टाकावीत, प्रकाशकांनी नष्ट करावीत, त्याची भरपाई आपण देऊ, असे वक्तव्य केले होते. या पुरस्काराने समाजाने केलेल्या अन्यायाचे परिमार्जन काही अंशी झाले एवढेच.