05 April 2020

News Flash

प्रा. गीता सेन

संयुक्त राष्ट्रातही लोकसंख्या निधी संस्थेवर त्यांनी भारतीय संदर्भातील सल्लागार म्हणून काम केले होते.

भारताच्या काही प्रांतांत लोकसंख्यावाढीचा दर स्थिरावत असताना उत्तरेकडील राज्यांत तसे घडून येताना दिसत नाही, असे अलीकडच्या काही अभ्यासांमधून दिसून आले आहे. याच अनुषंगाने स्त्री आरोग्याचा विचार पुढे येतो. मुलगा होण्याच्या हव्यासातून अनेकदा बाळंतपणे सुरूच राहतात. स्त्रियांचे आरोग्य बिघडत जाते, त्याचबरोबर बालकांचेही कुपोषण होत असते. लोकसंख्या, स्त्री आरोग्य धोरण या क्षेत्रात ज्या काही मोजक्या स्त्रीवादी संशोधक सक्रिय कामही करीत आहेत त्यांपैकी एक म्हणजे प्रा. गीता सेन. त्या प्रतिष्ठेच्या डॅन डेव्हिड पुरस्कारातील यंदाच्या मानकऱ्यांपैकी एक आहेत. तेल अवीव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाऊंडेशनचा १० लाख डॉलर्सचा हा पुरस्कार त्यांना देबोरा डिनीझ यांच्यासमवेत विभागून मिळाला आहे. त्यांनी लोकसंख्या धोरण, प्रजनन व लैंगिक आरोग्य, महिला हक्क, दारिद्रय़, कामगार बाजारपेठा, जागतिक प्रशासन अशा अनेक व्यापक विषयांत काम केले आहे. ‘रामलिंगस्वामी सेंटर ऑन इक्विटी अँड सोशल डिटर्मिनंट ऑफ हेल्थ’च्या संचालक व ‘डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्हज विथ विमेन फॉर न्यू इरा’या संस्थेत समन्वयक आहेत. लोकसंख्या धोरणासह अनेक क्षेत्रांत त्यांनी गेली ३५ वर्षे संशोधन केले, त्यातून लोकसंख्या व विकास या विषयावरील धोरणांना जागतिक पातळीवरही नवीन दिशा मिळण्यात मदत झाली आहे. ग्रामीण भागातील वंचित गटांवरील त्यांचे संशोधन महत्त्वाचे असून हे काम करताना त्यांनी याच क्षेत्रात अनेक संशोधकांची फळी उभी केली आहे. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट केली. हार्वर्ड विद्यापीठात त्या ‘जागतिक आरोग्य व लोकसंख्या’ या विषयाच्या संलग्न प्राध्यापक; तर बंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत त्या ‘सार्वजनिक धोरण’ या विषयाच्या प्राध्यापक आहेत. संयुक्त राष्ट्रातही लोकसंख्या निधी संस्थेवर त्यांनी भारतीय संदर्भातील सल्लागार म्हणून काम केले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रजनन आरोग्य व संशोधन या विषयावरील वैज्ञानिक व तंत्रज्ञान सल्लागार गटाच्या त्या सदस्य असून पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेच्या लिंगभाव समानता व आरोग्य विभागाच्या सल्लागार आहेत. भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमातील सुकाणू गटाच्या त्या सदस्य आहेत. ‘जेंडर इक्विटी इन हेल्थ- द शिफ्टिंग फ्रंटियर्स ऑफ एव्हिडन्स अँड अ‍ॅक्शन’, ‘विमेन्स एम्पॉवरमेंट अँड डेमोग्राफिक प्रोसेसेस- मूव्हिंग बियाँड कैरो’, ‘पॉप्युलेशन पॉलिसीज रीकन्सिडर्ड-हेल्थ, पॉप्युलेशन अँड राइट्स’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 2:22 am

Web Title: profile of prof gita sen zws 70
Next Stories
1 राजा मयेकर
2 विनायक जोशी
3 राजू भारतन
Just Now!
X