हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या आधीपासून आणि नंतर ज्या पिढीने साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात पायाभूत काम केले, त्यात तुकाराम शंकर अर्थात तु. शं. कुळकर्णी यांचे नाव अग्रभागी होते. कथा, कविता आणि समीक्षा या तिन्ही प्रकारांत लेखन करणारे ‘तु.शं.’ यांचा पिंड मात्र कथाकाराचा. नवकथेच्या काळात त्यांनी लिहिलेल्या कथांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाल्यानंतर मराठी, कन्नड आणि तेलुगू भाषकांमध्ये झालेले सामाजिक, राजकीय व जीवनशैलीचे बदल नेमकेपणाने टिपणारे लेखक, अशी त्यांची ओळख राज्यभर होती. त्याहीपेक्षा मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकर्ता म्हणून त्यांनी बांधलेली संघटनात्मक मोट, त्यातून नवलेखक आणि वाङ्मयाला मिळालेले प्रोत्साहन याची साक्ष अनेक जण आजही देतात. त्यामुळे ‘तु.शं.’ यांचे निधन साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे.

‘तृणाची वेदना’, ‘ग्रीष्मरेखा’, ‘अखेरच्या वळणावर’ या प्रसिद्ध कथासंग्रहांबरोबरच कविता आणि समीक्षकात्मक लेखन करणारे तु. शं. कुळकर्णी हे बी. रघुनाथ यांच्यानंतरचे मराठवाडय़ातील नवकथाकार. हिंगोली जिल्ह्य़ाच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील त्यांचा जन्म. १९६१ साली त्यांनी कला शाखेतील पदवी पूर्ण केली तेव्हा मराठी विषयात ते पहिले आले होते. पुढे मराठीचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते औरंगाबाद येथे सरस्वतीभुवन महाविद्यालयात प्राध्यापक आणि पुढे विभागप्रमुख झाले. पण हैदराबाद येथे शिकत असल्यापासून त्यांचे लेखन सुरू होते. १९५५, १९६० आणि १९८२ मध्ये त्यांचे वर उल्लेखलेले तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या कवितालेखनाचा काळ प्रामुख्याने १९५२ ते १९५७ असा होता. ‘कानोसा’ हा त्यांचा काव्यसंग्रह. परंपरागत संस्कार, जीवनाबद्दलच्या रूढ अपेक्षा, नैतिकता, आर्थिक कुचंबणा आणि त्यात बदलणारी परिस्थिती अशा चक्रातील माणसे हा ‘तु.शं.’ यांच्या लेखनाचा गाभा होता. त्यामुळे त्यांचे लेखन मौलिक ठरते. मराठवाडय़ासारख्या मागास भागातील माणूस टिपण्याचे काम त्यांनी केले. पु. शि. रेगे यांच्या ‘छंद’पासून ते ‘वाचा’पर्यंतच्या ‘लिट्ल मॅगेझिन’ चळवळीशी त्यांचा संबंध आला.

पण हे सारे करताना त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेसाठी केलेले काम अधिक मौलिक होते. १५ वर्षे त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र ‘प्रतिष्ठान’च्या संपादनाचे काम केले. साहित्यविश्वातील संस्था म्हणून लेखक-कवी यांना लेखनासाठी व्यासपीठ निर्माण करून देणे, हे त्यांचे परिषदेतले खरे काम. संघटनकौशल्याच्या जोरावर त्यांनी साहित्य महामंडळ आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिकांना प्रोत्साहन दिले. त्यासाठीचे कार्यकर्तेपणही त्यांनी आवर्जून जपले. त्यामुळेच त्यांच्या निधनाची पोकळी वाङ्मयीन क्षेत्रात जाणवणारी आहे.