शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश निषिद्ध मानणाऱ्या केरळ राज्याच्या भर राजधानीत- तिरुवनंतपुरम शहरात- भरणाऱ्या प्रसिद्ध ‘नवरात्रि संगीत उत्सवा’मध्ये महिला कलावंतांना २००६ पर्यंत कधीही संधी दिली जात नसे. कर्नाटक संगीताचा हा मोठा उत्सव आणि ती परंपरा महिलांनीही समृद्ध केलेली; पण गायक-वादक सारे पुरुषच. ही पुरुषश्रेष्ठत्वाची पोकळ भिंत पहिल्यांदा मोडली ती गायिका आणि गानगुरू विदुषी परस्सला बी. पोन्नम्मल यांनी. वयाच्या ८२ व्या वर्षी या महोत्सवात त्या गायल्या, तेव्हापासूनच महिलांना या व्यासपीठावर स्थान मिळाले. केरळच्या कर्नाटक संगीत क्षेत्रात हे एकच नव्हे तर अनेक कवाडे महिलांसाठी खुली करणाऱ्या म्हणून पोन्नम्मल यांची आठवण राहीलच; त्याहीपेक्षा त्यांचे शास्त्रोक्त- सच्चे सूर त्यांच्या निधनानंतरही प्रेरणा देत राहतील.

१९२४ साली परस्सला गावात, ‘भगवती’ अम्मल यांच्यापोटी जन्मलेल्या (म्हणून नावात ‘बी.’) पोन्नम्मल यांचे वडील आर. महादेव अय्यर यांनी मुलीला कर्नाटक संगीत शिकवले, ‘स्वाती तिरुनाल म्यूझिक कॉलेज’ तिरुवनंतपुरममध्ये (तेव्हाचे त्रिवेन्द्रम) १९३९ पासून सुरू झाले, तेव्हा पहिल्याच ‘बॅच’मध्ये १५ वर्षांच्या पोन्नम्मलही दाखल झाल्या. वर्गात ही एकच मुलगी… आधुनिक संस्थेत जाऊन कर्नाटक संगीत शिकून ‘गानभूषण’ पदवी घेणारी केरळमधली पहिलीच! पुढे लग्न, संसार, दोन मुलांचा जन्म वगैरे सांभाळून त्या एका कन्याशाळेत संगीत शिकवू लागल्या, पण लवकरच ‘आरएलव्ही अकॅडमी ऑफ म्यूझिक’ या संस्थेत गानगुरू म्हणून त्यांना स्थान मिळाले. निवृत्तीनंतरही अनेक शिष्य त्यांनी घडवले.

चमत्कृतीला स्थान न देता, मूळच्या शुद्ध स्वरूपातील कर्नाटक संगीत जपणाऱ्यांपैकी त्या होत्या. हिंदुस्तानी व कर्नाटक संगीतामध्ये कधी तुलना करू नये; पण करायचीच तर- धोंडूताई कुलकर्णींसारखा सात्त्विकपणा त्यांच्या गाण्यात असे. शुद्ध शब्दोच्चार, पक्के सूर, एकही मात्रा इकडची तिकडे न करताही भाव पोहोचवायचा आहे याची समज हे अंगभूत गुण पोन्नम्मल यांच्याकडे होते. २०१७ मध्ये पोन्नम्मल यांना ‘पद्माश्री’ने गौरविण्यात आले… त्याच वर्षी, ‘नवरात्रि संगीत उत्सवा’त त्या अखेरच्या गायल्या. पुढे त्यांचे जाहीर कार्यक्रम कमी झाले तरी अगदी अखेरपर्यंत त्या शिकवत राहिल्या. त्यांच्या निधनाने भारतीय (कर्नाटक शैली) संगीताच्या मौखिक आणि आधुनिक शिक्षणपद्धतींमधील एक दुवा निखळला आहे.