News Flash

प्रेरणा राणे

लोकांपर्यंत आपण पोहोचायला हवे, म्हणून वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीलाच लोकविज्ञान जथ्याचे प्रदर्शन लावण्याची कल्पनाही त्यांची.

कार्यकर्तेपण सांभाळणे हीच जणू आजकालच्या कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी ठरली असताना, प्रेरणा राणे यांचे ७ मे रोजी झालेले निधन चटका लावणारे ठरते. लोकविज्ञान चळवळीत अनेकांना आणणाऱ्या, समाजाशी या चळवळीचे नाते जोडणाऱ्या कार्यकत्र्या आणि कॉर्पोरेट विश्वातील प्रशिक्षक म्हणून आलेल्या अनुभवाचा फायदा समाजातील गरजवंत घटकांना तसेच ग्रामीण भागातील, कामगारवस्तीतील मुली-मुलांना करून देणाऱ्या प्रेरक म्हणून ‘प्रेरणा राणे फाऊंडेशन’तर्फे त्यांनी केलेले काम अनेकांना, विविध प्रकारे आठवते. परळ भागात वाढलेल्या, आर. एम. भट विद्यालयात शिकलेल्या प्रेरणा यांनी मुंबईच्या व्हीजेटीआय (आता वीरमाता जिजाबाई तंत्रशिक्षण संस्था) या प्रतिष्ठित संस्थेत यंत्र अभियांत्रिकी शाखेची पदवी (१९७७) आणि पदव्युत्तर पदवी (१९८३) अव्वल गुणांनीशी घेतली, पण याच काळात बाबा आमटेप्रणीत सोमनाथ शिबिरामध्ये, अन्य समविचारी तरुणांसह ‘समाजासाठी काही केलेच पाहिजे’ हा विचार पक्का झाला. शहरांतही ग्रामीण समाजजीवनाचे पैलू कसे घट्ट असतात, त्यातून अंधश्रद्धा कशा टिकतात, हे बालपणापासून डोळसपणे पाहिल्यामुळे ‘लोकविज्ञान चळवळ’ महाराष्ट्रात रुजवणे प्रेरणा यांना कठीण गेले नाही, याची साक्ष त्यांनी रचलेली गाणीही देतात. गवळण, भजने, सिनेसंगीत यांच्या लोकप्रिय चालींवरली ही गाणी प्रेरणा यांच्या आवाजात खुलत. लोकांपर्यंत आपण पोहोचायला हवे, म्हणून वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीलाच लोकविज्ञान जथ्याचे प्रदर्शन लावण्याची कल्पनाही त्यांची. या प्रदर्शनास भक्तांनी यावे आणि नवी दृष्टी घेऊन जावे, याच्या युक्त्या त्या योजत. व्हीजेटीआयमध्ये अध्यापनाचे काम सांभाळून हे सारे सुरू असे. पुढे आयआयटीतून संगणकशास्त्रात त्यांनी पीएच.डी. मिळवली आणि टेक महिन्द्र या कंपनीत प्रशिक्षण विभाग प्रमुख म्हणून पावणेसहा वर्षे काम केले. ऑक्टोबर २०१० पासून ‘प्रेरणा राणे फाऊंडेशन’ स्थापन झाले. होडावडे (ता. वेंगुर्ला) हे त्यांचे मूळ गाव. तालुक्यातील आठवीपासूनच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व प्रशिक्षण देण्यापासून सुरू झालेले हे काम पुढे जिल्ह्यापर्यंत वाढले. पुण्यातील सफाई वा अन्य कामे करणाऱ्या कामगारांच्या मुला-मुलींसाठी शैक्षणिक वर्गही या संस्थेने भरवले. २०११ पासून ‘आयसॅब्स’ (इंडियन सोसायटी फॉर अ‍ॅप्लाइड बिहेवियरल सायन्स) या संस्थेत आधी संशोधनप्रमुख, मग कार्यवाह आणि २०१५ नंतर पश्चिम भारत विभागप्रमुख म्हणून लोकसंवाद वाढवताना, पुणे आणि सिंधुदुर्गातील कामही प्रेरणा यांनी पुढे नेले. ‘प्रेरणा राणे फाऊंडेशन’ची व्याप्ती वाढविणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 12:20 am

Web Title: profile prerna rane akp 94
Next Stories
1 गौरी अम्मा
2 कृ. गो. धर्माधिकारी
3 एस. जी. नेगिनहाळ
Just Now!
X