ओडिशात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करणारे, पुढे राज्य माहिती आयुक्त असलेले प्रा. राधा मोहन यांनी शेतीतही लक्ष घातले… आणि ‘सेंद्रिय शेतीचे उद्गाते’ अशी ओळख निर्माण केली! त्यांच्या या कार्याला त्यांची कन्या साबरमती हिचीही जोड होती. कृषी क्षेत्रातील कामगिरीसाठी बापलेकीला २०२० मध्ये ‘पद्माश्री’ने गौरवण्यात आले होते. १९९० पासून या दोघांनी नयागड जिल्ह्यात ओडागाव येथे सेंद्रिय कचऱ्यापासून जमीन सुपीक केली. आता तेथे एक हजार झाडे असून काळा तांदूळ व लवंग अशी पिके त्यांनी घेतली. जैवविविधता राखण्यासाठी ७०० स्वदेशी बियाणे जमा करून त्यांनी बीजपेढीही उभारली.

राधा मोहन यांचा जन्म नयागडचाच. पदवीनंतर अर्थशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांची राज्याचे माहिती आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. निवृत्तीनंतर राज्य नियोजन आयोगाचे सदस्य, राज्य पाणलोट कार्यक्रम, राज्य वन्यजीव सल्लागार समिती, एनएसएस सल्लागार समिती, वन व्यवस्थापन समिती व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ या संस्थांत त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर राज्यासाठी करून दिला असेच म्हणावे लागेल.

ग्रामविकासाची कहाणी
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

नोकरी-व्यवसाय सांभाळून त्यांनी सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले. कृषी क्षेत्रातील ज्ञानामुळे त्यांचा दबदबा होता. अर्थशास्त्र व परिसंस्था यातही ते खूप जाणकार होते. सेंद्रिय शेतीची आवड त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण केली, त्यासाठी ‘संभव’ नावाची संस्था उभी केली. राधा मोहन हे पुरीच्या एससीएस महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते, पण अखेरपर्यंत त्यांनी शेतीमधील प्रयोग सुरूच ठेवले. त्यात त्यांना मुलीच्या कामाची जोड मिळाली. त्या अर्थाने त्यांनी सेंद्रिय शेतीचा वारसा घरातही समृद्ध केला. नयागडमध्ये उजाड माळरानासारख्या जमिनीवर त्यांनी वृक्षलागवड करून हिरवाई निर्माण केली. एक एकरापासून सुरुवात करून ८९० एकर जमिनीवर वनीकरण केले. पर्जन्य जलसंवर्धनासाठी तळी निर्माण केली. तांदळाच्या ५०० प्रजाती त्यांच्याकडे होत्या. आंबा, लिची, फणस, चिकू अशी अनेक फळझाडे त्यांनी लावली. ‘संभव’ संस्थेमार्फत त्यांनी सेंद्रिय शेतीची अनेक तंत्रे शेतकऱ्यांना शिकवली. स्थानिक शेतकऱ्यांना शाश्वत शेती व जैवविविधतेच्या रक्षणाचे बाळकडू दिले. बियाणे दत्तक योजनेत ते शेतकऱ्यांना देशी बियाणे देत असत व त्यांचे संवर्धन करण्याची शपथ त्यांना घ्यायला लावत. त्यातून आपल्या जैवविविधतेचा वारसाही त्यांनी जपला. अशा या निसर्ग व शेती यांची सांगड घालणाऱ्या भूमिपुत्राच्या निधनाने खरोखरच शेती क्षेत्रातील दीपस्तंभ निमाला आहे.