लहानपणीच अनाथपण आल्यामुळे सुपारीसोल्या, हॉटेलात वेटर, पाणीपंप कामगार अशी कामे सुरुवातीला त्यांना पोटापाण्यासाठी करावी लागली. केरळच्या कोळिकोड जिल्ह्य़ात पी. टी. उमर कोया यांच्या आयुष्याची सुरुवात अशी एखाद्या सामान्य प्याद्याप्रमाणे झाली. पण जीवनपटावरील आव्हाने पेलत ते ‘वजीरपदापर्यंत’ पोहोचले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचे ते १९९६ ते २००६ या काळात उपाध्यक्ष होते. पी. टी. उमर कोया भारत आणि भारताबाहेरील बुद्धिबळ रसिकांना ज्ञात असण्याची शक्यता नाही. परंतु भारतातील बुद्धिबळपटूंसाठी उमर कोया आधारवड होते. विश्वनाथन आनंदच्या देदीप्यमान कारकीर्दीला नव्वदच्या दशकात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तो मुख्यत युरोपमध्ये खेळायचा. अशा वेळी आनंदच्या तोडीचे बुद्धिबळपटू भारतात घडवण्यासाठी ज्या क्रीडा संघटकांनी पुढाकार घेतला, त्यांत कोया अग्रस्थानी होते.

कष्टाळू क्रीडा संघटकांची केरळमध्ये कधीच वानवा नव्हती. कोया हे याच परंपरेतले. आनंदला आदर्श मानून अनेक मुले-मुली या खेळामध्ये उतरत होते. पण या नव्या कौशल्याला वाव मिळेल, अशा तोडीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, प्रशिक्षण वर्ग, पुस्तके, प्रशिक्षक असा महत्त्वाचा जामानिमा जुळवण्याचे महत्कार्य उमर कोया यांनी केले. कोया यांनी भारतात काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवून दाखवल्या. सन २००० मधील जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, २००२ मधील बुद्धिबळ विश्वचषक; शिवाय १९९३, १९९८, २००२ आणि २००४ मधील जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा ही उमर कोया यांच्या कष्टांची आणि संपर्ककौशल्याची फलश्रुती. भारताचा क्रमांक दोनचा बुद्धिबळपटू पेंटाल्या हरिकृष्ण याच्यासाठी विशेष प्रशिक्षकाची सोय त्यांनी करून दिली. आनंदसारखे आणखी दर्जेदार बुद्धिबळपटू घडवून भारताला या खेळातील महासत्ता बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. ज्युनियर गटाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यामुळेच नवीन सहस्रकात भारतातून उत्तमोत्तम युवा बुद्धिबळपटू महत्त्वाच्या स्पर्धामध्ये दिसू लागले. महिला बुद्धिबळ स्पर्धा मोठय़ा हॉटेलांमध्ये भरवून त्यांनी नवा पायंडा पाडला.  बुद्धिबळ स्पर्धात टायब्रेकरची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी विकसित केलेल्या पद्धतीला ‘कोया सिस्टीम’ असे नाव दिले गेले, हेही कौतुकास्पदच.

त्यांची कारकीर्द वादातीत नव्हती. देशातील तमिळनाडूसारख्या प्रबळ राज्य संघटनांनी त्यांच्यावर निधी अपहाराचे आरोप केले होते. स्पर्धासाठीचे नोंदणी शुल्क वाढवणे किंवा बक्षिसाच्या रकमेचा १० टक्के भाग कापून घेण्यासारखे त्यांचे निर्णय बुद्धिबळपटूंच्या रोषाचे कारण ठरले. असे असले, तरी एक बुद्धिबळ संघटक म्हणून त्यांनी  छाप पाडली हे निश्चित. गेल्या आठवडय़ात मकरसंक्रांतीच्या दिवशी वयाच्या ६९व्या वर्षी काहीशा अकाली त्यांची जीवनयात्रा संपुष्टात आली.