आधुनिक काळात, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि ब्रुनेईच्या राजानंतर प्रदीर्घ काळ राज्य करणारा राज्यकर्ता अशी ओळख असणारे आणि ज्यांच्या राज्यरोहणाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष यंदा सुरू आहे, ते ओमान या अरब देशाचे सुलतान काबूस बिन सइद यांची शनिवारी आलेली निधनवार्ता जागतिक शांततेविषयी प्रयत्नरत असणाऱ्यांसाठी सद्य:स्थितीत निराशाजनकच आहे. १९४० मध्ये जन्मलेल्या काबूस यांनी आपले प्राथमिक शिक्षण राजवाडय़ातच खासगी शिक्षकांकडून घेतले. नंतर काही काळ भारतात पुण्यातील ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’मध्ये लष्करी प्रशिक्षण घेऊन, इंग्लंडमध्ये पुढील शिक्षण घेतले. आधुनिक शिक्षण घेतलेले तरुण काबूस स्वदेशी परतले आणि आपल्या पुराणमतवादी विचारांच्या वडिलांचा पराभव करून १९७० साली त्यांनी सत्ता ताब्यात घेतली. लगोलग अंतर्गत बंडाळ्या मोडून सध्याच्या संयुक्त अरब अमिरातींच्या दक्षिणेपासून खाली येमेनच्या उत्तरेपर्यंत ‘सल्तनत ऑफ ओमान’ हे एकसंध राष्ट्र निर्माण केले. काबूस यांच्या काळातच ओमानमध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. ओमानच्या अर्थव्यवस्थेचे खनिजतेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी काबूस यांनी वाहतूक, ऊर्जा, आरोग्य, सुरक्षा, अन्नधान्य, व्यापार, पर्यटन, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांत गुंतवणूक  सुरू केली. शिक्षणाचे विकेंद्रीकरण केले. मुस्लीम स्त्रीजीवनाला मुक्त जगाची वाट दाखवणाऱ्या काबूस यांनी स्त्रियांसाठी विविध शिक्षणसुविधा पुरवल्या, अगदी परदेशातील विद्यापीठांच्या शिष्यवृत्त्याही सुरू केल्या. याची गोड फळे आज तिथे दिसतात. ‘शुरा कौन्सिल’ची निवडणूक लढण्याचा व मतदानाचा अधिकारही त्यांनीच ओमानी स्त्रियांना दिला. या महत्त्वाच्या धोरणांबरोबरच शिया वा सुन्नी यांपैकी कोणत्याही कट्टर गटांत सामील न होता, इबादी या सहिष्णु पंथाचे पालन करणाऱ्या काबूस यांनी जागतिक राजकारणात अलिप्ततेचे धोरण स्वीकारले होते. इतर अरब देश, अमेरिका, युरोपीय राष्ट्रे आणि पूर्वेकडील देशांशीही त्यांनी कायमच शांततेचे संबंध ठेवले. सामरिकदृष्टय़ा अरबी सागरात मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ओमानमध्ये शिरकाव करण्याची क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनची इच्छा काबूस यांनी कधीच पूर्ण होऊ  दिली नाही. इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष असो वा अरब जगतातील कोणताही वाद; ते शांततेच्या मार्गाने सोडवण्याच्या अनेक शक्यता त्यांच्या अलिप्त धोरणामुळेच निर्माण झाल्या. इराण आणि अमेरिकेच्या संघर्षांत कितीही दबाव आला, तरी शांतताप्रिय धोरणावर बोट ठेवून हातात शस्त्र घेण्यास त्यांनी नेहमीच नकार दिला. सध्याचा इराण-अमेरिका संघर्ष पाहता, काबूस यांच्यासारखा अनुभवी आणि  शांतताप्रिय राज्यकर्ता आखातात असणे अधिक गरजेचे असतानाच, काबूस यांचे जाणे अधिक क्लेशदायी ठरते.