29 March 2020

News Flash

सुनंदा पटनाईक

भारतीय अभिजात संगीतात स्त्री कलावंतांची संख्या नेहमीच कमी राहिली आहे.

सुनंदा पटनाईक हे नाव अभिजात संगीताच्या क्षेत्रात विशेषत्वाने लक्षात राहिले ते त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या गायनशैलीमुळे. तारसप्तकात लीलया हिंडून येताना, त्यांचा सुरांवरचा ताबा कधी ढळला नाही आणि भान व्यक्त करण्याच्या हातोटीलाही ओहोटी लागली नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी आकाशवाणीवरून आपले गायन सादर करणाऱ्या सुनंदाबाईंनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण कुंदला आदिनारायण यांच्याकडून आणि नंतर ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे घेतले. पुण्यात त्यांचे संगीत अध्ययन सुरू असतानाच त्यांनी संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही मिळाली. ओडिशा संगीत नाटक अकादमी, ओडिशा सोसायटी ऑफ अमेरिकन्स यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या.

भारतीय अभिजात संगीतात स्त्री कलावंतांची संख्या नेहमीच कमी राहिली आहे. विष्णू दिगंबरांनी त्या दृष्टीने केलेल्या अथक प्रयत्नांनंतर विविध घराण्यांमध्ये महिला अभिजात संगीत शिकू लागल्या. स्त्रीला जन्मत:च गायनानुकूल गळा लाभल्याने या कलेत निपुण होण्यास फार सायास करावे लागत नाहीत, असेही दिसून आले. मात्र प्रतिभा आणि सर्जनशीलता यांचे वरदान लाभलेल्या कलावंतांनाच रसिकांकडून मनोमन दाद मिळते. सुनंदाबाईंच्या बाबतीत अशी दाद सतत मिळत गेली आणि त्यामुळे त्यांच्या गायनातील अभिजातताही अधिक उजळून निघाली. त्यांचे वडील बैकुंठनाथ पटनाईक हे कवी होते. घरात पहिल्यापासूनच अभिजात कलांचा वावर होता. ज्या काळात मुलीने गायन करणे फारसे प्रतिष्ठेचे मानले जात नव्हते, तेव्हा त्यांची गायन शिकण्याची हौस त्यांच्या वडिलांनी पुरी केली आणि त्यामुळेच ग्वाल्हेर घराण्याच्या पठडीत एका स्त्री कलावंताची मोलाची भर पडली. त्यांच्या गायनातील भरदारपणा आणि घराण्याची कडक शिस्त जशी लक्षात राहणारी होती, तशीच त्यांची सादरीकरणाची खास शैलीही लक्ष वेधून घेत असे.

सुनंदा पटनाईक यांनी भारतातील बहुतेक सगळ्या संगीत परिषदांमधून आणि महोत्सवांमधून आपले गायन सादर केले. देशाच्या कानाकोपऱ्यात आपले गायन पोहोचले पाहिजे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची डॉक्टर ऑफ म्युझिक ही पदवी त्यांनी संपादन केली होती. संगीत सादर करणाऱ्या कलावंताने त्या विषयातील आपला अभ्यासही नेटाने सुरू ठेवण्याचे सुनंदा पटनाईक हे आगळे उदाहरण. त्यांच्या निधनाने संगीतातील एक अभ्यासू विदुषी काळाच्या पडद्याआड गेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2020 12:01 am

Web Title: profile sunanda patnaik akp 94
Next Stories
1 प्रा. सुरजित हन्स
2 ख्रिस्तोफर टॉल्कीन
3 डॉ. अजयन विनू
Just Now!
X