News Flash

स्वातिलेखा सेनगुप्ता

‘बेला शेषे’ हा पुनरागमनाचा पहिलाच चित्रपट, सौमित्र चटर्जींसह २०१५ मध्ये आला.

स्वातिलेखा सेनगुप्ता कोण, असा प्रश्न मराठीजनांना पडणे साहजिक पण ‘घरे बाइरे’ म्हणजे काय, असा प्रश्न कुणालाही पडणे हे स्वत:च्याच सांस्कृतिक दिवाळखोरीचे प्रदर्शन. गुरुदेव रवीन्द्रनाथांची ती कादंबरी, त्याच नावाच्या चित्रपटाद्वारे १९८४ मध्ये सत्यजित राय यांनी अजरामर केलेली… त्यात एक नाकासमोर चालणारा गृहस्थ आणि एक क्रांतिकारक यांची आयुष्ये एका स्त्रीमुळे- गृहस्थाच्या पत्नीमुळे- परस्परांशी भिडतात. व्हिक्टर बॅनर्जी (गृहस्थ) आणि सौमित्र चटर्जी (चळवळीतील युवक) यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांसमोर ‘बिमला’च्या भूमिकेत सत्यजित राय यांनी उभे केले ते कॅमेऱ्याचा जराही अनुभव नसलेल्या स्वातिलेखा यांना. अर्थात, अभिनय मात्र स्वातिलेखांचा स्थायिभावच होता. अलाहाबादला १९५० च्या दशकात, बालपणापासून अभिनय पाहात आणि पुढे हिंदी, बंगाली नाटकांत भाग घेत कोलकात्याच्या प्रसिद्ध ‘नांदीकार’ संस्थेत १९७७ पासून कार्यरत झालेल्या स्वातिलेखा. त्यांनी ‘बिमला’ स्वत:च्या शैलीत साकारली… पण त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मात्र व्हिक्टर बॅनर्जी- तोही ‘सहायक अभिनेते’ म्हणून घेऊन गेले व आपल्याला कॅमेऱ्यासमोरचा अभिनय जमतच नाही काय, या शंकेने स्वातिलेखांना घेरले. ते इतके की, ‘माझ्या मनात आत्महत्येचेही विचार येत, पण मुलीकडे (अभिनेत्री व नाट्यदिग्दर्शिका सोहिनी सेनगुप्ता) पाहून मी जगले’ अशी कबुली त्यांनी एका मुलाखतीत दिली होती. ‘घरे बाइरे’नंतरही रंगभूमी मात्र त्यांनी सोडली नाही. इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी व लंडनच्या ‘ट्रिनिटी कॉलेज’मधून संगीताचा अभ्यासक्रम शिकून मिळवलेली पदविका, अशा शिक्षणाचा वापर त्यांनी रंगभूमीसाठी केला. पती रुद्रप्रसाद सेनगुप्ता हे ‘नांदीकार’चे आधारस्तंभ म्हणावेत असे दिग्दर्शक, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याही दिग्दर्शक झाल्या, अनेक कादंबऱ्यांच्या रंगावृत्ती त्यांनी केल्या तसेच नाटकांच्या संगीतकार म्हणूनही काम केले. ‘अ‍ॅण्टिगनी’, ब्रेश्तची ‘ग्रूशा’ अशा आव्हानात्मक भूमिकांमधून, रंगभूमीचा आणि अभिनयाचा बौद्धिक विचार म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिले. २०११ च्या ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कारा’ने रंगभूमीच्या या सेवेचे चीज झाले, तोवर ‘नांदीकार’मध्ये स्वातिलेखा यांचा शिष्यवर्गही तयार झाला होता. या पुरस्कारानंतरच त्या पुन्हा चित्रपटांतही अभिनय करू लागल्या. ‘बेला शेषे’ हा पुनरागमनाचा पहिलाच चित्रपट, सौमित्र चटर्जींसह २०१५ मध्ये आला. त्यानंतर मूत्रपिंड विकाराचे दुखणे बळावले तरीही, २०१९ पासून ‘बरोफ’, ‘बेला शुरू’, ‘धर्मजुद्ध’ या चित्रपटांत त्यांनी अभिनय केला. यांपैकी अखेरचे दोन चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:03 am

Web Title: profile swatilekha sengupta akp 94
Next Stories
1 प्रा. राधा मोहन
2 डॉ. रिचर्ड अर्न्‍स्ट
3 डिंको सिंग
Just Now!
X