धर्मस्वातंत्र्यासाठी भांडणारे, वारंवार कोठडीत वा नजरकैदेत राहावे लागूनही हेका न सोडणारे आणि केवळ धार्मिक स्वातंत्र्याचाच नव्हे, तर लोकशाहीचा आग्रह धरणारे, अशी त्यांची ख्याती होती. त्यासाठीच त्यांच्या नावाची शिफारस शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी देखील अनेकदा झाली होती. व्हिएतनामसारख्या साम्यवादी देशात त्यांनी हे काम नेटाने पुढे नेले, हे विशेष. या थिच क्वांग डो यांचे शनिवारी निधन झाले. बौद्ध धर्माच्या एका पंथपरंपरेचे ते प्रमुख प्रचारक असूनही, माझ्या  अंत्यसंस्कारांचा बडिवार माजवू नका. फार तर तीन दिवस प्रार्थना करा पण सभा वगैरे घेऊ नका, आदरांजलीची वहीदेखील ठेवू नका, माझी सारी राख समुद्रात विखरूदे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी मृत्यूपूर्वीच अनुयायांना दिल्या होत्या.

क्वांग डो यांचा जन्म १९२८ चा. म्हणजे १९४५ साली व्हिएतनामच्या हो चि मिन्ह यांनी फ्रेंचांपासून स्वातंत्र्य मिळवून साम्यवादी राजवट स्थापली तेव्हा  क्वांग डो यांचे वय होते अवघे सतरा. आपल्या गुरूंना व्हिएतनामी साम्यवाद्यांचे ‘सामाजिक न्यायालय’ देशविरोधी ठरवून देहदंडाची शिक्षा देते आणि ती अमलातही येते हे त्या वयात क्वांग डो यांना पाहावे लागले आणि त्यांनी निश्चय केला की काहीही करून आपण आपल्या धर्मासाठी, आपल्या पंथासाठी काम करत राहायचे.

याची किंमत त्यांना वारंवार मोजावी लागली. हिंसेचे उघड समर्थन कधीही न करूनही ‘तुम्ही हिंसा घडवताहात. तुम्ही देशविरोधी आहात’ अशा आरोपांचे तर्कट कोणाही विरुद्ध रचणे सर्वसत्ताधीश राजवटींना कधीच कठीण नसते. तसेच आरोप क्वांग डो यांच्यावर अनेकदा झाले. ते ‘परकी एजंट’ आहेत, ‘त्यांचे बोलविते धनी कोणी निराळेच असावेत’ या प्रकारचा अपप्रचारही क्वांग डो यांच्याविरुद्ध भरपूर झाला. मात्र न डगमगता आपले काम सुरू ठेवायचे, हा बुद्धाचा मार्ग त्यांनी अविचलपणे अनुसरला. केवळ धार्मिक स्वातंत्र्य नव्हे तर लोकशाहीचाही पुरस्कार त्यांनी केला. लोकशाहीत अपेक्षित असलेली सप्तस्वातंत्र्ये हवी, यासाठी साम्यवादी राजवटीतही त्यांनी जनजागृती केली. ‘अपील फॉर डेमोक्रसी’ (लोकशाहीसाठी आवाहन) हे  त्यांनी प्रसृत केलेले निवेदनवजा लिखाण ३०,००० हून अधिक जणांना पटल्याची ग्वाही अमेरिकी धर्मस्वातंत्र्य समितीने दिली होती.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही क्वांग डो यांचे काम पोहोचले होते. नॉर्वेचा ‘राफ्टो पुरस्कार’ त्यांना २००६ मध्ये जाहीर झाला. मात्र २००३ पासून आजतागायत, व्हिएतनाम सरकारने त्यांच्यावर अनेक बंधने घातली होती. क्वांग डो यांच्या निधनाने, ‘धर्म कोणताही असो, तो अनुसरण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला हवे’ याची आठवण देणारा ज्येष्ठ कार्यकर्ता हरपला आहे.