दूरदर्शनवर क्रीडा सामन्यांचे तुटपुंजे प्रक्षेपण केले जात होते, त्या काळात इंदूर, पुण्यासारख्या टेबल टेनिसची परंपरा असलेल्या शहरांत ज्यांचा आक्रमक खेळ पाहण्यासाठी चाहते गर्दी करायचे असे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टेबल टेनिसपटू आणि प्रशिक्षक वेणुगोपाल चंद्रशेखर ऊर्फ चंद्रा यांचे करोनामुळे नुकतेच निधन झाले. १९८४ मध्ये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेचे निमित्त झाले आणि त्यांची कारकीर्द वयाच्या पंचविशीत, ऐन बहरात असताना संपुष्टात आली. परंतु ते खचले नाहीत, तर प्रशिक्षक म्हणून मैदानावर परतले, हा त्यांचा आयुष्याचा लढा लक्षवेधी होता.

चंद्रशेखर यांचा जन्म मद्रासचा (चेन्नई). वयाच्या १२व्या वर्षी चंद्रशेखर मद्रास बंदर स्पर्धेत प्रथमच टेबल टेनिस स्पर्धेत खेळले. त्यानंतर ईमेसूर क्रीडा परिषदेत त्यांना खेळाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळाले. यात योगाचाही समावेश होता. १९७० मध्ये चंद्रशेखर यांनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या उपकनिष्ठ गटात विजेतेपद संपादन केले. मग १९७३ मध्ये कनिष्ठ राज्य अजिंक्यपदाच्या जेतेपदासह वरिष्ठ राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी तीनदा राष्ट्रीय जेतेपदाचा बहुमान मिळवला. त्यांच्या मंजित दुवा, मनमीत सिंग, सुधीर फडके आणि कमलेश मेहता यांच्याविरुद्धच्या लढती प्रचंड गाजल्या. १९८२ मध्ये त्यांनी राष्ट्रकुल अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, तर अमेरिकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेच्या उपविजेतेपदापर्यंत भरारी घेत सर्वांचे लक्ष वेधले. याच बळावर १९८२ मध्ये चंद्रशेखर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९८३ मध्ये टोक्यो जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत भारताला दुसऱ्या विभागातून प्रथम विभागात नेण्यात चंद्रशेखर यांचा सिंहाचा वाटा होता. खेळाप्रमाणेच चंद्रशेखर हे अभ्यासातही अव्वल असायचे. डी. जी. वैष्णव महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी तसेच मद्रास विधि महाविद्यालयातून वकिलीची पदवी त्यांनी विशेष श्रेणीसह मिळवली आणि मद्रास विद्यापीठाची सुवर्णपदके कमावली. त्यांना रोखपाल (कॅशियर) म्हणून बँकेत नोकरी मिळाली.

१९८४ मध्ये इंदूर येथील एका स्पर्धेत मंजितविरुद्धच्या अंतिम सामन्यात प्रेक्षकाच्या वैयक्तिक शेरेबाजीमुळे चंद्रशेखर यांनी जेतेपदावर पाणी सोडले होते. याच वर्षी चंद्रशेखर यांची इस्लामबादला होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. परंतु गुडघ्याच्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेसाठी त्यांनी या दौऱ्यातून माघार घेतली. चेन्नईच्या एका रुग्णालयात चुकीच्या पद्धतीने भूल दिल्यामुळे चंद्रशेखर यांची वाचा गेली, धुरकट दिसू लागले व शारीरिक हालचालीही मंदावल्या. रुग्णालयात ३६ दिवस कोमात आयुष्याशी झुंज दिल्यानंतर ८१ दिवस पुनर्वसनात घालवले. क्रीडापटू, राजकारणी, कलावंत अशा अनेकांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे परदेशात उपचार घेऊन त्यांना सावरता आले. मग चंद्रशेखर यांनी अपोलो रुग्णालयाविरोधात खटला भरला, तो बरीच वर्षे चालला आणि त्यांना न्याय मिळाला. या खडतर लढ्यावर बेतलेले ‘माय फाइटबॅक फ्रॉम डेथ्स डोअर’ (२००६) हे आत्मचरित्र सीता श्रीकांत यांच्या साहाय्याने चंद्रशेखर यांनी लिहिले. ती झुंज अखेर १२ मे रोजी, त्यांच्या निधनाने संपली.