गायक विनायक जोशी यांच्या आकस्मिक निधनाने मराठी भावसंगीताचा अनमोल ठेवा रसिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘स्वरभाव’यात्रेची अखेर झाली आहे. त्यांचे लाघवी आणि निर्मळ व्यक्तिमत्त्व चिरकाल स्मरणात राहील. मराठीतील पाऊस गाण्यांवर आधारित ‘सरींवर सरी’, गायक कुंदनलाल सैगल यांच्या गाण्यांचा ‘बाबुल मोरा’, सैगल यांच्यासह शमशाद बेगम, बेगम अख्तर, मुबारक बेगम या गायिकांच्या गाण्यांचा ‘तीन बेगम एक बादशाह’; वसंत प्रभू, वसंत पवार आणि वसंत देसाई यांच्या गाण्यांवरील ‘वसंत बहार’; संदीप गुप्ते यांच्या गझलांवरली ‘जरा सी प्यास’, ‘सूर नभांगणाचे’ ही त्यांच्या काही कार्यक्रमांची नावे. ज्येष्ठ लेखिका-समीक्षिका प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली इंदुरात झालेल्या ७४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात जोशी यांनी मराठी भावसंगीताची वाटचाल उलगडणारा ‘स्वरभावयात्रा’ हा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी सादर केला होता. त्याच इंदुरात शनिवारी भक्तिसंगीताचा कार्यक्रम, अस्वस्थ वाटत असूनही त्यांनी पूर्ण सादर केला. इंदूर- डोंबिवली बसप्रवासात असताना धुळे येथे काळाने त्यांच्यावर घाला घातला.

विनायक जोशी यांचे शास्त्रीय संगीतातील प्राथमिक शिक्षण पं. एस. के. अभ्यंकर यांच्याकडे झाले. संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांच्याकडे सुगम संगीताचे आणि पुढे गझल गायनासाठी  पं. विजयसिंह चौहान यांचे मार्गदर्शन लाभले. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘स्वरभावयात्रा’ या त्यांच्या प्रकाशित झालेल्या सदराचे पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले होते. या सदरातून मराठी भावसंगीताची ९० वर्षांची वाटचाल उलगडून दाखविली, त्यात पाच लेखांची भर घालून हे पुस्तक तयार झाले. त्याच नावाच्या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता, निवेदन आणि गायन जोशी यांचे होते. ‘राधे तुझा सैल अंबाडा’ ते ‘राधा ही बावरी’पर्यंतचा मराठी भावगीतांचा प्रवास त्यांनी या कार्यक्रमातून उलगडला होता.  ‘गीत नवे गाईन मी’ हा संगीतकार उदय चितळे व गायिका रंजना जोगळेकर यांच्यासह त्यांनी केलेला कार्यक्रम प्रसिद्ध कवींच्या, पण गीत म्हणून सादर न झालेल्या गाण्यांचा होता. सुधीर फडके यांच्या हिंदीतील योगदानाची दखल घेणाऱ्या ‘ज्योति कलश झलके’ या कार्यक्रमाचीही निर्मिती, संकल्पनाही जोशी यांची होती. ज्येष्ठ गायक वसंत आजगावकर व गीतकार मधुकर जोशी यांच्या गाण्यांची ५० वर्षे ‘करात माझ्या वाजे कंकण’मधून साजरी झाली होती.

बँक ऑफ इंडियातील नोकरी आणि ‘चतुरंग प्रतिष्ठान’चे कामही सांभाळून जोशी यांचा हा सांगीतिक प्रवास, कार्यक्रम सुरू होते. मराठी भावसंगीताच्या रसिकांसाठी विनायक जोशी यांचे असे हे आकस्मिक जाणे चटका लावणारे आहे.