05 April 2020

News Flash

वासिम जाफर

क्रिकेटवर निस्सीम प्रेम याव्यतिरिक्त वासिम जाफरला क्रिकेट मैदानावर २५ वर्षे तगण्यासाठी वेगळ्या कारणाची गरजच नव्हती.

 

क्रिकेटवर निस्सीम प्रेम याव्यतिरिक्त वासिम जाफरला क्रिकेट मैदानावर २५ वर्षे तगण्यासाठी वेगळ्या कारणाची गरजच नव्हती. भारतीय क्रिकेट संघातून खेळण्याची संधी त्याला अधूनमधून मिळत राहिली. तिथे शतक-द्विशतक झळकावूनही त्याला सातत्य दाखवता आले नाही म्हणण्यापेक्षा, निवड समितीने त्याच्यावर सातत्याने विश्वास दाखवला नाही असेच म्हणावे लागेल. द.आफ्रिकेविरुद्ध त्याच देशात शतक झळकावणारा तो आजवरचा एकमेव भारतीय सलामीवीर. एकाधिक द्विशतके झळकावणाऱ्या मोजक्या फलंदाजांपैकी तो एक. पैकी एक द्विशतक वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्या भूमीवर, तर दुसरे पाकिस्तानविरुद्ध मायदेशी. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये ३४ ही सरासरी सेहवाग, सचिन, द्रविड, लक्ष्मणच्या युगात लक्षवेधक नव्हती. २००८ मध्ये वासिमची कसोटी कारकीर्द काहीशी अकालीच संपुष्टात आली. महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूसाठी ही अतिशय नैराश्यपूर्ण बाब. वासिम याला अपवाद ठरला. कारण त्याचे क्रिकेटवर, मुंबईवर प्रेम होते. रणजी क्रिकेटच्या खाणीतूनच सचिन, सुनीलसारखी रत्ने गवसली. तेथील दर्जा आयपीएलच्या उदयानंतरही कमी झाला नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे वासिम जाफरसारखे फलंदाज तेथे प्रदीर्घकाळ खेळत राहिले. रणजी क्रिकेटमधील त्याची आकडेवारी थक्क करणारीच. सर्वाधिक सामने (१५६), सर्वाधिक धावा (१२,०३८), सर्वाधिक शतके (४०), सर्वाधिक झेल (२००) त्याच्याच नावावर आहेत. याशिवाय दुलीप करंडक (२,५४५) व इराणी करंडक (१,२९४) या स्पर्धात त्याच्या सर्वाधिक धावा आहेत. दोन रणजी हंगामांमध्ये (२००८-०९, २०१८-१९) एक हजाराहून अधिक धावा फटकावणाराही तो एकमेव फलंदाज. मुंबईचा सलामीवीर आणि कर्णधार या दोन्ही जबाबदाऱ्या त्याने पार पाडल्या. मुंबईकडून खेळून वासिमने आठ रणजी अजिंक्यपदे पाहिली, पैकी दोनदा तो कर्णधार होता. गेले तीन हंगाम तो विदर्भाकडून खेळतो. प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याबरोबरच विदर्भाच्या गेल्या दोन सलग रणजी विजेतेपदांमध्ये वासिमचेही योगदान मोलाचे ठरले. यंदाच्या हंगामात विदर्भासाठी विजेतेपदांची हॅट्ट्रिक करण्याची त्याची इच्छा होती. पण गुडघ्याच्या दुखापतीने ते साध्य होऊ शकले नाही. तरीदेखील वयाच्या ४२ व्या वर्षीपर्यंत क्रिकेट खेळत राहणारे त्याच्यासारखे दुर्मीळच. मुंबईत बेस्ट बसचालकाचा, एका संक्रमण शिबिरात वाढलेला मुलगा ते कसोटीपटू, महान रणजीपटू असा त्याचा प्रवास त्याच्यासारख्या असंख्यांसाठी प्रेरणादायीच. बांगलादेश क्रिकेट अकादमीचा तो सल्लागार आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाचा मोठा लाभ बांगलादेशच्या जगज्जेत्या युवा संघाला झाला. धावांचा तो भुकेला होता. कटुता आणि नैराश्य यांना त्याने कधीच थारा दिला नाही. भारतीय क्रिकेटचा महासागर पोहून जाण्यासाठी तंदुरुस्त व आशावादी राहावे, हा धडा वासिम जाफरने घालून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 12:23 am

Web Title: profile wasim jaffer akp 94
Next Stories
1 षडाक्षरी शेट्टर
2 जोगिंदर सिंग सैनी
3 फ्रीमन डायसन
Just Now!
X