‘चीनला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढणारे’ अशी युआन लाँगपिंग यांची ख्याती. त्यांनी शेतीशास्त्रज्ञ म्हणून तांदूळ उत्पादन या एकाच विषयावर लक्ष केंद्रित केले. या विषयावर काम करणाऱ्या काही मोजक्या वैज्ञानिकांत त्यांचा समावेश होतो. दुष्काळी काळात त्यांच्या संशोधनाचा अर्थ उमगला. नुकतेच त्यांचे चीनमध्ये निधन झाले. १९३० साली बीजिंगमध्ये जन्मलेल्या युआन यांचे आईवडील दोघेही शिक्षक. त्याहीमुळे असेल, पण आत्यंतिक हलाखीतही त्यांच्या कुटुंबाने त्यांचे शिक्षण खंडित होऊ दिले नाही. बालपणात त्यांनी अनेक संघर्ष पाहिले. राजकीय तणाव अनुभवले. चीनमधील चोंगकिंग येथील ‘साऊथवेस्ट अ‍ॅग्रिकल्चर कॉलेज’ या संस्थेत त्यांचे शिक्षण झाले. १९४९ पासून युआन यांना कृषी जनुकशास्त्रात विशेष रस वाटत गेला. त्याहीवेळी हे तंत्रज्ञान वादग्रस्त होते, कारण त्यामुळे पर्यावरण धोक्यात येते असा समज तेव्हा होता. पदवीधर झाल्यानंतर त्यांनी ‘हनान अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेस’ या संस्थेत अध्यापन केले. चीनमध्ये माओ झेडाँग यांच्या काळात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने १९५८ पासून ‘चिमण्या मारून टाका’सारखे उपक्रम सुरू केले, कृषीपेक्षा उद्योगांना प्राधान्य दिले, अन्नपुरवठ्याकडे दुर्लक्ष केले. त्यातून देश दुष्काळाच्या खाईत सापडला. १९६२च्या सुमारास ३.६ ते ४.५ कोटी लोक उपासमारीला बळी पडले. स्वत: युआन यांनी त्यांच्या आत्मकथनात असे लिहिले आहे की, त्या वेळी चीनच्या रस्त्यांवर भुकेने मरून पडलेल्या लोकांच्या प्रेतांचा खच पडला होता. तेव्हा चिनी राज्यकर्त्यांना उमगले, की शेतीकडेही लक्ष दिले पाहिजे. युआन यांनी देशात तांदळाचे नवीन वाण तयार करण्यावर १९७०पासून भर दिला. त्यांनी तयार केलेल्या संकरित तांदळाच्या वाणामुळे, कमी क्षेत्रफळातही तांदळाचे उत्पादन २० टक्के वाढले. त्यातून लाखो लोकांना अन्नसुरक्षा मिळाली. आशिया व आफ्रिकेत तांदळाचा वापर वाढला. अनेक लोक उपासमारीने मरण्यापासून वाचले. युआन यांच्या संशोधनामुळे जगात तांदळाचे उत्पादन वाढले. एकूण तांदळापैकी एक पंचमांश तांदूळ त्यांनी विकसित केलेल्या वाणांचा होता. युआन हे नंतर चीनमध्ये नायक ठरले. त्यांना चीनने सर्वोच्च पदक बहाल केले. अलीकडे, २००८ मध्ये बीजिंगमधील ऑलिम्पिक ज्योत नेण्याचा मानही त्यांना मिळाला होता. त्यांच्या निधनानंतर अनेक शोकाकुल लोक रुग्णालयाबाहेर जमले होते. त्यांचा संशोधनाचा वारसा चालवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे.