पत्रकारिता हा जग अगदी वेगळ्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रांत, त्यामुळे पत्रकारिता करतानाच अनेकांना ललित लेखनाचे जगही खुणावत असते. ही स्थिती जशी आज आहे तशीच पूर्वीही होती. अर्थात त्यासाठी पत्रकाराकडे  सर्जनशीलता हवी. सर्जनशीलता व पत्रकारिता अशा दोन्हींचा संगम असलेले रसेल बेकर हे त्यामुळेच वेगळे होते. ते पत्रकार,  उत्तम लेखक व दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे सादरकर्तेही होते. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू माध्यमकार व लेखकाला आपण मुकलो आहोत.

दूरचित्रवाणीवर त्यांनी केलेला ‘मास्टर पीस थिएटर’ हा कार्यक्रमही त्यांच्या खास शैलीमुळे गाजला. वार्ताहर, स्तंभलेखक, समीक्षक, दूरचित्रवाणी कार्यक्रम सादरकर्ते या नात्याने त्यांची कारकीर्द बरीच व्यापक होती. १९७९ मध्ये ‘ऑब्झव्‍‌र्हर’ या दी न्यूयॉर्क टाइम्समधील स्तंभासाठी त्यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला. १९८३ मध्ये त्यांनी ग्रोईंग अप हे आत्मचरित्र लिहिले. त्यासाठी त्यांना १९८३ मध्ये जीवनचरित्र गटात पुन्हा पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. महामंदी व दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात त्यांची घडण झाली. १९४७ मध्ये त्यांनी वार्ताहर म्हणून दी बाल्टीमोर सन या वृत्तपत्रातून सुरुवात केली. नंतर ते दी न्यूयॉर्क टाइम्समध्ये काम करू लागले. अर्थात त्यासाठी त्यांना १९५४ पर्यंत वाट पाहावी लागली. तेथे त्यांनी व्हाइट हाऊस व परराष्ट्र खाते, अमेरिकी काँग्रेस या विभागांचे वार्ताकनही केले होते. १९८४ मध्ये त्यांनी रोनाल्ड रीगन यांच्यावर विनोदी लेखन करून त्यांचा दूरचित्रवाणी कार्यक्रम बेतला होता, पण ते सगळे रेगन यांनी विनोदानेच घेतले. ही सहिष्णुता आपल्याकडे नाही हे प्रत्येक वेळी दिसून आले आहे. त्यांचा ऑब्झव्‍‌र्हर हा स्तंभ संघराज्य सरकार, राजकारण व राजनीती यांचा सोप्या भाषेत वेध घेणारा ठरला. त्या काळात दी न्यूयॉर्क टाइम्समध्ये जे लेखन प्रसिद्ध होत असे, त्यापेक्षा बेकर यांची धाटणी वेगळी होती. त्यामुळेच ते सरस ठरले. बेकर यांचा जन्म १९२५ मधला. दुसऱ्या जागतिक महायुद्धात त्यांनी वैमानिक म्हणून काम केले. जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ते दी बाल्टीमोर सनमध्ये गुन्हेगारीविषयक वार्ताहर झाले. १९५३ मध्ये ते याच वृत्तपत्रात लंडनमध्ये प्रमुख बनले. अ‍ॅलिस्टर कुकनंतर १९९३ मध्ये ते  मास्टर पीस थिएटर या कार्यक्रमाचे यजमान होते. त्यांनी अनेकदा साहित्याचे दूरचित्रवाणी  रूपांतरण करताना काही प्रमाणात स्वातंत्र्य घेतले, पण ते आवश्यक तेवढेच. अ‍ॅन अमेरिकन इन वॉशिंग्टन, नो कॉज फॉर पॅनिक, पुअर रसेल्स अल्मनॅक, रसेल बेकर्स बुक ऑफ अमेरिकन ह्य़ूमर, लुकिंग बॅक- हिरोज, रास्कल्स अँड अदर आयकॉन्स ऑफ दी अमेरिकन इमॅजिनेशन  ही त्यांची पुस्तके गाजली.