एकीकडे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा आजाराशी लढा सुरू असतानाच, ‘आशियातील पेले’ अशी उपाधी मिळवलेले भारताचे माजी फुटबॉलपटू पूंगम कण्णन यांनी विविध आजारांशी झुंजून रविवारी अखेरचा श्वास घेतला. अप्रतिम पदलालित्याने चेंडूवर नियंत्रण राखून बचावपटूंची फळी भेदणारे जादूगार म्हणून पूंगम कण्णन ओळखले जात. अफाट गुणवत्ता असलेले कण्णन तमिळनाडूतील वंदवासी येथून कोलकात्यात आल्यानंतर मोहन बागान या क्लबने त्यांच्यातील गुणवत्ता अचूक हेरली. त्यानंतर कण्णन यांनी आठ वर्षे मोहन बागानचे प्रतिनिधित्व केले. या संघाला १९६७ व १९७१ मध्ये रोव्हर्स चषकाचे जेतेपद मिळवून देण्यात कण्णन यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर कण्णन हे ईस्ट बंगालकडून खेळू लागले. पण एका वर्षांतच ईस्ट बंगाल क्लबला रामराम केल्यानंतर त्यांनी मोहम्मेडन स्पोर्टिग आणि हावरा युनियन या संघांचे प्रतिनिधित्व केले. कोलकात्याच्या फुटबॉल क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कण्णन यांनी मोहन बागानसाठी ८४, ईस्ट बंगालसाठी १४, तर मोहम्मेडन स्पोर्टिगसाठी १२ गोल लगावले. संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत त्यांनी बंगालचे प्रतिनिधित्व केले आणि १९६६, १९७२ व १९७३ मध्ये बंगालला विजेतेपदी नेले. बेंगळूरुमध्ये असताना कण्णन यांनी म्हैसूरला १९६५मध्ये संतोष करंडक या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद जिंकून दिले होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्यांनी १४ सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. १९७४ मध्ये विश्वचषक जिंकणारा पश्चिम जर्मनीचा संघ अ. भा. फुटबॉल महासंघाच्या निमंत्रणानुसार भारत दौऱ्यावर आला असताना कण्णन यांच्या खेळाने प्रभावित झाला होता. बायर्न म्युनिकचे माजी प्रशिक्षक व प. जर्मनी संघाचे सहप्रशिक्षक डेटमर क्रॅमर यांनीच कण्णन यांना ‘आशियातील पेले’ ही उपाधी दिली! व्यावसायिक फुटबॉलमधील अखेरच्या टप्प्यात कण्णन हे चेन्नईला आले. युनिव्हर्सल आरसी संघाकडून खेळल्यानंतर त्यांनी १९८२ मध्ये व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. मात्र चेन्नईत त्यांचा जीव रमेना. म्हणूनच ज्या शहराने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले, त्याच कोलकात्यात ते निवृत्तीनंतर स्थायिक झाले. कण्णन यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि दक्षिण रेल्वेत नोकरी केली. पण पेन्शनअभावी त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना असंख्य अडचणी येत होत्या. विविध आजारांनी वेढा घातल्याने आर्थिक अडचण अधिकच तीव्र होत गेली. अखेरच्या क्षणी उपचारांसाठी त्यांच्या कुटुंबाकडे पैसे नव्हते. ६० आणि ७०च्या दशकात भारतीय फुटबॉलमधील या महान खेळाडूची स्थिती पाहून आर्थिक मदतीसाठी अनेकांनी पुढाकारही घेतला, पण वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.