पर्यावरण क्षेत्रात दर वर्षी ब्रिटनमधील ‘दी व्हिटले फंड फॉर नेचर’ या संस्थेच्या वतीने पुरस्कार दिले जातात, त्यांना ग्रीन ऑस्कर म्हटले जाते. यंदा हा पुरस्कार दोघा भारतीयांना मिळाला आहे त्यात एक आहेत आसामच्या पक्षी संवर्धन कार्यकर्त्यां पूर्णिमादेवी बर्मन तर दुसरे आहेत. कर्नाटकचे वन्यजीव संवर्धन कार्यकर्ते संजय गुब्बी. एकूण ६६ देशांतील पर्यावरण कार्यकर्त्यांतून त्यांची निवड करण्यात आली आहे.

पूर्णिमा या हार्गिला म्हणजे ग्रेटर अ‍ॅडज्युटंट स्टॉर्क या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. त्यांनी आसामात कामरूप जिल्ह्य़ातील दादरा, पंचारिया, हिंगिमारी खेडय़ांमध्ये या पक्ष्यांसाठी मोठे काम केले आहे. त्यामुळे त्या भागात बर्मन यांना स्टॉर्क सिस्टर म्हणजे स्थानिक भाषेत हार्गिला बैदू म्हणून ओळखले जाते. ३५ हजार पौंडांचा हा व्हिटले पुरस्कार पर्यावरण प्रकल्पास मदतीच्या रूपात दिला जातो. विशेष म्हणजे बर्मन यांची सगळी संस्था महिलांची आहे. आसाममधील पाणथळ जागेत आढळणारे हार्गिला पक्षी निसर्गाचे स्वच्छता दूत असतात. वयाच्या ३७ व्या वर्षी बर्मन यांनी पक्षी संवर्धनाचे उभे केलेले काम निश्चितच प्रशंसनीय आहे. सध्या हार्गिला स्टॉर्क (चित्रबलाक) पक्ष्यांची जगातील संख्या १२०० असून त्यातील ७५ टक्के आसाममध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्थेच्या मते या पक्ष्यांची संख्या १२०० ते १८०० असून त्यातील ८०० आसामात तर १५६ बिहारमध्ये आहेत. या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी बर्मन यांनी २००९ पासून ‘अरण्यक’ ही संस्था चालवली असून त्यात फक्त महिलाच काम करतात. आसामी महिलांनी स्कार्फ व साडय़ा विणून त्यांची विक्री केली व त्या निधीतून या संस्थेसाठी पैसा उभा केला आहे. हा पुरस्कार म्हणजे जीवनात मोठा बदल घडवणारी घटना असल्याचे पूर्णिमा सांगतात. आता त्या पुरस्काराचा निधी या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वापरणार आहेत. बर्मन यांनी कामरूप जिल्ह्य़ात पीएच.डी. करीत असताना पक्षी संवर्धनाचे काम हाती घेतले. पूर्णिमा यांनी वाडय़ा वस्त्यांमध्ये जाऊन स्थानिक लोकांमध्ये या पक्ष्यांच्या संवर्धनाचा संदेश पोहोचवला आहे. त्यासाठी त्यांनी पोस्टर्स, बॅनर्स या मार्गाचा वापर केला. हा पक्षी म्हणजेच तुमची संपत्ती आहे त्याला वाचवणे हे तुमचे कर्तव्य आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे व तो तेथील लोकांमध्ये रुजला आहे. यापूर्वी बर्मन यांना रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचा अर्थ हिरो पुरस्कार मिळाला होता.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
Inspiring story of Mumbai's varun sawant who is autistic chef and ultra marathoner
गोष्ट असामान्यांची Video: ऑटिस्टक शेफ आणि अल्ट्रा मॅरेथॅानर वरुण सावंतचा प्रेरणादायी प्रवास
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती

कर्नाटकातील वन्यजीव संरक्षक कार्यकर्ते संजय गुब्बी यांनी वाघांचा वावर असलेल्या मार्गिकांचे संरक्षण केले. त्यासाठी त्यांना व्हिटले पुरस्कार मिळाला आहे. गुब्बी यांनी निसर्ग व वन्यजीवांसाठी विद्युत अभियंत्याच्या नोकरीवर पाणी सोडले. २०१२ मध्ये त्यांनी कर्नाटक सरकारच्या मदतीने व्याघ्र संवर्धनाचे क्षेत्र वाढवले. वन्यजीव व माणूस यांचे परस्पर संबंध सौहार्दाचे असले पाहिजेत त्यामुळेच वाघांबरोबर स्थानिक लोकांचे रक्षणही ते कर्तव्य मानतात. कर्नाटकात सध्या सर्वाधिक बंगाल टायगर्स आहेत व २०१५ मध्ये ही संख्या १० ते १५  होती. पुढील काही वर्षांत ती १०० पर्यंत नेण्याचा त्यांचा विचार आहे. व्याघ्र अधिवास क्षेत्रातील जंगलतोड कमी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कारण वाघांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सुरक्षित अधिवास मिळाला पाहिजे. गुब्बी यांनी नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन या म्हैसुरू येथील संस्थेच्या माध्यमातून वन्यप्राणी संवर्धनाचे काम केले असून १९७० पासून वन्य प्राण्यांच्या सुरक्षित अधिवासाचे क्षेत्र ३७ टक्के वाढवले आहे. त्यांनी कँटरबरी येथील केन्ट विद्यापीठातून मास्टर्स इन कन्झर्वेटिव्ह बायॉलॉजी ही पदवी घेतली असून नंतर या विषयातील त्यांचे सगळे ज्ञान वन्यजीवांच्या संवर्धनासाठी वापरले आहे. त्यात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांची मदत घेऊन काम केले आहे हे विशेष.