22 November 2019

News Flash

पुरुषोत्तम बोरकर

पत्नीला कर्करोग झाल्यावर ते काही वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील खामगावजवळ सुटाळा गावी राहायला गेले

पुरुषोत्तम बोरकर

रसरशीत, पण तितकाच अंतर्मुख करणारा आशय प्रयोगशील कादंबऱ्यांमधून मांडणारे कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर मूळचे बोरगाव- बोऱ्हाळा गावचे. पत्नीला कर्करोग झाल्यावर ते काही वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील खामगावजवळ सुटाळा गावी राहायला गेले.. अन् तिथंच त्यांचं बुधवारी (१६ जुलै) हृदयविकारानं निधन झालं.

बोरकरांचे वडील अकोल्याला प्राथमिक शाळेत शिक्षक होते. तिथलं ‘ताकवाले प्रेस’ प्रसिद्ध आहे. या प्रेसमध्ये ते पुस्तकं वाचत. अशा वाचत्या माणसांना असतो, तसाच बोरकरांचाही सुरुवातीला कवितेकडं ओढा होता. दहावीत असतानाच त्यांची पहिली कविता एका मासिकात छापून आली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मात्र त्यांनी काही लघुकादंबरीस्वरूप लेखन केलं. तेव्हा तेजीत असलेला रहस्यकथांचा प्रकारही त्यांनी त्या काळात हाताळला. त्यातून मिळणाऱ्या मानधनावरच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. मग अकोल्याला जिल्हा सहकारी बँकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून काही काळ काम केलं. बँकेच्या मुखपत्राचंही संपादन ते करत. पुढे अकोल्यात विविध वृत्तपत्रांतही बोरकरांनी काम केलं खरं; परंतु नोकरीच्या धबडग्यात न रमता ते पूर्णवेळ लेखनाकडंच वळाले.

वऱ्हाडी भाषेतलं ‘होबासक्या’ नावाचं सदर ते लिहीत. शहरी विदर्भासह खेडय़ापाडय़ांतूनही हे सदर प्रचंड लोकप्रिय झालं होतं. तत्कालीन घडामोडींवरील वऱ्हाडी उपरोध त्या सदरातून प्रकटायचा. कवितेला वाहिलेलं नियतकालिकही त्यांनी काही काळ चालवलं होतं.

परंतु बोरकरांनी ठसा उमटवला तो त्यांच्या कादंबरीलेखनातून. ‘मेड इन इंडिया’ ही त्यातली पहिली कादंबरी. पु. ल. देशपांडे, शांता शेळके यांच्यासारख्यांनी कौतुक केलेली ही कादंबरी स्वातंत्र्योत्तर ग्रामीण महाराष्ट्राचं दर्शन घडवणारी आहे. कादंबरीचा नायक असलेला पंजाबराव गरसोळीकर-पाटील हा साहित्याची आवड असणारा आहेच, पण तो गावचा सरपंचही आहे.  अस्सल वऱ्हाडीत हा पंजाबराव गावचं गुदमरलेपण मिश्कीलपणे सांगतो अन् सोबत वऱ्हाडीतलं भाषिक भांडारही वाचकासमोर रितं करत राहतो. त्यामुळे ही कादंबरी तोवरच्या कादंबऱ्यांत निराळी ठरली. ‘आमदार निवास रूम नं. १७६०’  ही त्यांची दुसरी कादंबरीही तशीच. किंबहुना जरा अधिकच राजकीय भाष्य करणारी. भाषिक भांडार आणि त्या संगतीनं होणारं संस्कृतिदर्शन हे याही कादंबरीचं वैशिष्टय़. सामाजिक प्रक्रियांतलं व्यंग नेमकं हेरण्याची बोरकरांची हातोटी जशी या कादंबरीतून दिसली, तशीच ती त्यांच्या ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ या कादंबरीतही दिसते. तपभरापूर्वी प्रसिद्ध झालेली ही कादंबरी ‘२०१९ सालातल्या महाराष्ट्राचं’ भेदक व्यंगचित्रण करणारी आहे.

या तिन्ही कादंबऱ्यांमुळे मराठी कादंबरीलेखन समृद्ध झालं आहे. मात्र, उपजीविकेसाठी त्यांना दीर्घकाळ चरित्रलेखनही करावं लागलं. माजी मंत्री शांताराम पोटदुखे यांच्यासह अनेक अधिकारी, उद्योजकांच्या चरित्रांचं लेखन त्यांनी केलं. अशा चरित्रग्रंथांची संख्या तीसहून अधिक आहे. शेतकऱ्यांची दैन्यवस्था आणि खेडय़ाची पडझड त्यांनी समर्थपणे मांडलीच; मात्र काही उत्तम कविता आणि गझलाही त्यांनी लिहिल्या होत्या. वऱ्हाडी मोकळाढाकळा स्वभाव असलेले बोरकर नव्या लिहित्यांनाही प्रोत्साहन देत असत.

First Published on July 20, 2019 2:41 am

Web Title: purushottam borkar profiles zws 70
Just Now!
X