22 October 2019

News Flash

प्रा. चंद्रकांत पुरी

अनेक तरुणांचे समाज-भान वाढविणारे, आदिवासींच्या प्रश्नांची नेमकी जाण असणारे प्रा. चंद्रकांत पुरी यांचे अवघ्या पन्नाशीत निधन झाले.

प्रा. चंद्रकांत पुरी

अनेक तरुणांचे समाज-भान वाढविणारे, आदिवासींच्या प्रश्नांची नेमकी जाण असणारे प्रा. चंद्रकांत पुरी यांचे अवघ्या पन्नाशीत निधन झाले. गेल्या आठवडय़ात अकस्मात आलेल्या या वार्तेवर अनेकांचा विश्वासही बसणे कठीण, इतके चैतन्य प्रा. पुरी यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. लौकिकार्थाने, एसएनडीटी महिला विद्यापीठातील दूरशिक्षण विभागाचे संचालक-प्राध्यापक ही त्यांची अखेरची ओळख. पण त्यांचे काम शिल्लक राहील, ते ‘कार्यकर्त्यांची डायरी’ यासारख्या पुस्तकामुळे. आणखीही पुस्तके त्यांनी लिहिली असती, पण तसे होण्याआधीच काळाने त्यांना ओढले.

मुंबईच्या टाटा समाजविज्ञान संस्थेतून समाजकार्याची पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली. या काळात, १९८९-९० मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील कैद्यांसाठी त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदकही मिळाले. १९९३ सालापासून रायगड जिल्ह्य़ातील आदिवासींमध्ये ते काम करू लागले. अवघ्या दोन वर्षांत आदिवासी तरुणांमधील नेतृत्वगुणांना वाव देऊन, घरबांधणी स्वयंसहायित प्रकल्प या समाजघटकाकडून यशस्वी करून घेणे, ही त्यांची कामगिरी. त्यासाठी त्यांना १९९५ मध्ये ‘वर्ल्ड हॅबिटाट अवॉर्ड’चे नामांकनही मिळाले होते, पण पुरस्काराने हुलकावणी दिली. पण काम करता-करता शिकणे, संशोधनवृत्ती जागी ठेवून समाज-संघटन क्षेत्रातील निरीक्षणे आणि निष्कर्ष यांना बळकटी देणे, हे त्यानंतरही अव्याहत सुरू राहिले. त्यामुळेच, सुमारे ५० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत आणि अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत.  १९९५ ते ९७ या दोन वर्षांत मुंबई मेट्रोमुळे बेघर होऊ शकणाऱ्या आठ हजार कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे – आणि अर्थातच ही कुटुंबे असमाधानी राहू नयेत, असा तोडगा सुचविण्याचे- काम त्यांनी सहज पार पाडलेच, पण त्यानंतर एसएनडीटी महिला विद्यापीठाचा दूरस्थ समाजकार्य अभ्यासक्रम त्यांनी आखून दिला. यासाठीची अभ्यास-साधने त्यांनी तयार केली. यानंतरच्या काळात ते समाजकार्य-शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक रमले. ‘एम. ए. इन सोशल एक्स्लूजन अँड इन्क्लूझिव्ह पॉलिसी स्टडीज’सारखा पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी घडविला. मात्र विद्यापीठीय क्षेत्रातून वेळ काढून नेतृत्व-प्रशिक्षण, कार्यकर्ते घडविणे, आदिवासी- बहुजन तरुणांना आपापल्या समाजाचा आणि त्यापलीकडचा विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे, यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. मुंबई विद्यापीठाच्या ‘राजीव गांधी समकालीन अभ्यास केंद्रा’चे प्रमुखपद त्यांच्याकडे २०१३ मध्ये चालून आले. या पदावर ते तीन वर्षे होते. याच काळात सरकारी धोरणांशी संबंधित काही अभ्यास-समित्यांवर, तसेच विद्यापीठीय सल्लागार समित्यांवर त्यांनी काम केले. स्वत: उत्तम लोकगीते गाणाऱ्या चंद्रकांत पुरी यांनी ‘अ. भा. मराठी शाहीर परिषदे’च्या कामालाही गती दिली होती.

First Published on June 12, 2019 12:41 am

Web Title: pvt chandrakant puri profile