भाऊ लोखंडे. एक असे नाव ज्यांनी एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक विद्रोहाची धग कायम जिवंत ठेवली व त्याच वेळी बुद्धाने शिकवलेल्या सम्यक करुणेचे दान प्रत्येक उपेक्षितांच्या झोळीपर्यंत पोहोचेल याची पुरेपूर काळजीही घेतली. भाऊंचा जन्म मध्य प्रदेशातील सौंसर तालुक्यातील संगमसावंगा या गावचा. आर्थिक दारिद्रय़ातून सुटका होईल, या आशेने त्यांचे कुटुंब नागपुरात आले. पण येथेही संघर्ष काही संपला नाही. लेकरांना जेवू घालण्यासाठी चार पैसे मिळावेत म्हणून संत्रा मार्केटमध्ये राबणाऱ्या आईला बघून भाऊंचे मन हेलावून जायचे. जगण्याच्या या संघर्षांनेच त्यांना समाजहिताच्या लढय़ासाठी प्रेरित केले. हा सनातन लढा जिंकायचा असेल तर हाती शिक्षणाचे धारदार शस्त्र हवे हे भाऊंना चांगले कळून चुकले होते. म्हणूनच त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षणाची कास सोडली नाही. या प्रदीर्घ प्रवासाच्या पहिल्या टप्प्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही त्यांचा संबध आला; पण तो फार काळ टिकला नाही. सामाजिक चळवळी ऐनभरात असलेला तो काळ होता. १९५६चे ऐतिहासिक स्थित्यंतर भाऊंनी अनुभवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची तेजोमय पहाट त्यांच्या आयुष्यात नव्याने उगवली. हा भाऊंचा वैचारिक पुनर्जन्म होता.

पुढे ‘रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन’मार्फत विद्यार्थी चळवळीचे कार्य सुरू झाले. भाऊंच्या कल्पकतेने वंचितांच्या चळवळीचा मार्ग प्रशस्त होत चालला होता. याच वेळी भाऊ आपल्या ज्ञानार्जनाचा मार्गही पूर्ण क्षमतेने चालत होते. ते पीएच.डी.साठी पुणे विद्यापीठात (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) गेले. ‘बौद्ध धम्माचा संतसाहित्यावरील प्रभाव’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यासाठी ते संत साहित्यासोबत, पाली भाषेतील साहित्याच्या मुळाशी पोहोचले.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
fake documents for passport
पारपत्रासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
arrest
रंग लावण्यासाठी अल्पवयीन मुलीला घरातून खेचून आणले; विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत आरोपीला अटक

पुढे ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले. त्याच्या आजवर अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. संत साहित्यातील करुणा आणि समतावादावर या पुस्तकाने नेमके बोट ठेवले. भाऊंनी ‘संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा’च्या पाली विभागात प्राध्यापक म्हणून काम केले, तेथे त्यांनी पीएच.डी.चे विद्यार्थीही घडवले. देशविदेशातील प्रज्ञावंतांच्या मंचांवर त्यांनी बौद्ध साहित्याचे सखोल चिंतन मांडले. याशिवाय त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले. ते विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

‘अयोध्या कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?’ हे त्यांचे अलीकडे गाजलेले पुस्तक. त्यातील प्रतिपादनाचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी पत्रकार परिषदाही घेतल्या होत्या. चळवळ आणि अभ्यास यांचा समन्वय साधणारे त्यांचे आणखी एक पुस्तक म्हणजे, ‘डॉ. आंबेडकरी हितशत्रूंच्या जाणिवा’! ‘महाकवी अश्वघोषरचित बुद्धचरित’ या पाली ग्रंथावर त्यांनी सटीक ग्रंथ लिहिला. शिवाय रशियातील बौद्धधर्म, सौन्दरनन्द महाकाव्यम्, ‘बौद्धांचे सण उत्सव आणि मानसिकता’ अशा विपुल ग्रंथसंपदेद्वारे समाजाला जागृत केले.

प्रसंगी अप्रिय भूमिका घेणाऱ्या भाऊंनी वाद-चर्चेस नाही म्हटले नाही. यातूनच परिवर्तन घडेल, असा त्यांचा विश्वास होता. परिवर्तनाचा हा वारसा पुढच्या पिढीच्या हाती सोपवून प्रा. लोखंडे २२ सप्टेंबर रोजी बुद्धवासी झाले.