मेंदुरोगांवरील उपचार हे अद्यापर्यंत तरी निर्णायक पातळीवर आलेले नाहीत. कंपवात तसेच मेंदूच्या इतरही दुर्धर आजारांवर अजूनही उपचार नाहीत. त्यावरील संशोधनही तुलनेने कमी प्रमाणात होताना दिसत असतानाच २०२१ मध्ये प्रा. पीटर गॉड्स्बी यांच्यासह चार मेंदू वैज्ञानिकांना ‘ब्रेन प्राइझ’ जाहीर करण्यात आले आहे. त्यात संशोधनाचा महत्त्वाचा भाग गॉड्स्बी यांचाच आहे. डेन्मार्कमधील ल्युंडबेक फाऊंडेशनकडून दरवर्षी २० लाख डॉलर्सचे हे पुरस्कार दिले जातात ते मेंदूवरील मूलभूत संशोधनासाठी. मेंदूवरच शरीराचे नियंत्रण अवलंबून असल्यामुळे साधी डोकेदुखीही धोकादायक ठरू शकते. पण डोकेदुखी व अर्धशिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे यात फरक आहे. त्याची निराळी कारणे या वैज्ञानिकांनी शोधली.  प्रा. गॉड्स्बी हे सिडनीतील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्समधून शल्यक्रिया शाखेत पदवीधर झाले. नंतर ते न्यूयॉर्क, पॅरिस व लंडनला गेले. त्यातून बरेच ज्ञान त्यांना मिळाले तरी ते सरतेशेवटी न्यू साऊथ वेल्सला परत आले. तेथे प्रिन्स ऑफ वेल्स रुग्णालयात ते प्राध्यापक व मेंदुरोगतज्ज्ञ म्हणून काम करीत. किंग्ज कॉलेज रुग्णालयात ते सल्लागार आहेत. जेम्स लान्स,  वैद्यक व आरोग्यशास्त्राचे प्राध्यापक व्लादो पेरकोविक हे त्यांचे ‘गुरू’. गॉड्स्बी यांनी मेंदुरोगशास्त्रात असामान्य अशीच कामगिरी केली आहे, असे पेरकोविक यांचे मत आहे. यापूर्वी मोसकोवित्झ यांनी १९७९ मध्ये अर्धशिशीवर काम केले होते; त्यांच्या मते चेतापेशीच्या धाग्यातून ‘न्यूरोपेप्टाइड्स’ सोडले जातात, तेव्हा रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन अर्धशिशी उद्भवते. पण न्यूरोपेप्टाइड कशामुळे सोडले जातात व ते कसे रोखावेत याचे गूढ कायम होते. अर्धशिशीच्या आजारास कारक ठरणाऱ्या न्यूरोपेप्टाइडचा ‘सीजीआरपी’ हा प्रकार गॉड्स्बी यांनी शोधला. सीजीआरपीला रोखले, की अर्धशिशी आटोक्यात येते. या संशोधनात प्रा. ओलसन हेही सहभागी होते. सीजीआरपी या न्यूरोपेप्टाइडच्या मार्गिका रोखण्यासाठी नवे औषध तयार करण्यात आले ते मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या स्वरूपात होते. अर्थात त्यामुळे अर्धशिशी हा रोग बरा होत नाही केवळ तो सुसह्य़ करता येतो. गॉड्स्बी यांना अनेक रुग्णांनी आतापर्यंत त्यांनी वेदना कमी करण्यासाठी तयार केलेल्या वैद्यकीय उपाययोजनांबाबत ईमेल पाठवून धन्यवाद दिले आहेत. स्वत: गॉड्स्बी यांच्या मते, यापेक्षा यशाची दुसरी पावती असू शकत नाही!