करोना निदानाची ‘फेलुदा चाचणी’ हे जीवशास्त्र व तंत्रज्ञान यांच्या संगमाचे उत्तम उदाहरण.  त्यामुळे विज्ञान शाखा या एकात्मीकरण महत्त्वाचे. याच दिशेने संशोधन करणाऱ्या देशातील मोजक्या वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे प्रा. सुमन चक्रबर्ती. अभियांत्रिकीचा उपयोग आरोग्यशास्त्रात काही साधनसुविधा निर्माण करण्यासाठी त्यांना अलीकडेच विज्ञान संशोधन क्षेत्रातील जी. डी. बिर्ला पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्योजक घनश्यामदास बिर्लांच्या स्मृत्यर्थ १९९१ पासून दिला जाणारा हा पुरस्कार पाच लाख रुपयांचा असतो. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्षा चंद्रिमा साहा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने चक्रबर्ती यांच्या कार्याची योग्य ती दखल घेतली. चक्रबर्ती हे खरगपूरच्या भारतीय प्रौद्योगिकी  संस्थेत प्राध्यापक आहेत. कोलकात्याच्या सेंट लॉरेन्स हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले, तर जादवपूर विद्यापीठातून १९९६ मध्ये पदवी घेतली. नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस या प्रख्यात संस्थेतून पदव्युत्तर पदवी तसेच पीएच.डी. मिळवली. अ‍ॅलेक्झांडर हुम्बोल्ट विद्यावृत्ती, भारत-अमेरिका संशोधन विद्यावृत्ती हे मान तर त्यांना मिळालेच पण जगातील अनेक विद्यापीठांत ते अभ्यागत प्राध्यापक आहेत. त्यांना भारत सरकारने जगदीशचंद्र बोस शिष्यवृत्तीही जाहीर केली होती. सूक्ष्मद्रायू हा त्यांच्या संशोधनाचा विषय असून त्यासाठी त्यांनी भारतातील पहिली प्रयोगशाळा उभारली. अर्धद्रवी पदार्थ वेगवेगळ्या मार्गिकातून कसे प्रवास करतात याचा अभ्यात या शास्त्रात केला जातो. चक्रबर्ती यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी अनेक संशोधनांचे पेटंट घेऊन ते उद्योगांना ते व्यावसायिक वापरासाठी दिले. रक्तातील पेशींची संख्या सांगणारी कमी किमतीची ‘स्पिनिंग डिस्क’, रक्ताच्या चाचण्यांसाठी कागदी पट्टीचे अधिक अचूक तंत्रज्ञान. कर्करोगाच्या पेशींचे वर्तन कसे होते हे सांगणारे ‘ट्यूमर ऑन अ चिप’ तंत्रज्ञान, न्युक्लिइक अ‍ॅसिड वर आधारित कमी खर्चाची कोविड संसर्ग शोध चाचणी ही त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे. त्यांना २००८ मध्ये तरुण वैज्ञानिक पुरस्कार, २०१३ मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार असे मानसन्मान लाभले आहेत. एकूण शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले असून त्यांची अनेक क्रमिक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. एकंदर चारशे शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. मायक्रोफ्लुइडिक्स व नॅनोफ्लुइडिक्स या दोन्ही विषयांत त्यांनी नवी दिशा देणारे संशोधन केले आहे.