उर्दू कथा साहित्यात सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई, कृष्ण चंदर आणि राजेंदर सिंग हे चार स्तंभ मानले जातात. त्यातही बहुसंख्य समीक्षक भाषाशैली, विषयांची मांडणी याचा विचार करून मंटो आणि चुगताई यांना वरचे स्थान देतात. असे असले तरी कर्रतुल ऐन हैदर, डॉ. अशफाक खान, डॉ. अब्दुल सत्तार काझी यांचेही उर्दू कथा साहित्यातील स्थान लक्षणीय आहे, हे नाकारता येणार नाही.

डॉ. काझी यांचा जन्म १९३३ चा. उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील मछरेटा हे त्यांचे मूळ गाव. शिक्षणासाठी ते लखनऊला आले. तेथून उर्दू साहित्यात एमए केल्यानंतर ते संशोधनासाठी अलिगढ मुस्लीम विद्यापीठात आले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी लिखाणास सुरुवात केली. विविध नियतकालिके व दैनिकांच्या पुरवण्यामधून त्यांच्या लघुकथा प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. ‘पीतल का घण्टा’ या कादंबरीची अनेक समीक्षकांनी दखल घेतली. मध्यल्या काळात कर्रतुल ऐन हैदर यांच्या ते संपर्कात आले. त्यांनीही त्यांच्या लेखनाचे कौतुक केले. अवध प्रान्तात त्या काळी जमीनदारी पद्धतीचे वर्चस्व होते. त्यांच्या दमनशाहीमुळे तेथील जनता कशी पिचली जात आहे याचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या कथांतून पुढे आले. पीएच. डी. मिळवल्यानंतर अलिगढ विद्यापीठाच्या उर्दू विभागात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मग निवृत्तीपर्यंत तिथेच रमले. अध्यापन करीत असताना त्यांचे लिखाणही सुरूच होते. कथालेखनाबरोबरच त्यांना भावलेल्या अनेक व्यक्तिरेखांवरही त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. दारा शिकोह, गालिब, शिकस्त कि आवाज, गुबार-ए-शाब, मज्जू भैया ही त्यांची ग्रंथसंपदा उर्दू साहित्यात महत्त्वाची मानली जाते. त्यातही गालिब यांच्यावरील त्यांची कादंबरी खूप गाजली.

लखनऊ, हैदराबाद दूरदर्शन केंद्रांनी त्यांच्यावर माहितीपटही बनवले. १९७४ मध्ये  त्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आले. वक्तशीरपणा हा त्यांचा महत्त्वाचा गुण होता. पाकिस्तानातील एका मासिकासाठी त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेला एक पत्रकार दिलेल्या वेळेपेक्षा दहा मिनिटे उशिरा आल्याने काझी यांनी त्यास परत पाठवून दिले होते. ज्याला वेळेची किंमत नाही तो आयुष्यात काहीच करू शकत नाही, अशी त्यांची धारणा होती. अल्पशा आजाराने परवा त्यांचे निधन झाले. डॉ. काझी यांच्या निधनाने उर्दू साहित्याने एक लखलखता हिरा गमावला, अशीच भावना अनेक मान्यवरांनी या वेळी व्यक्त केली.