22 July 2019

News Flash

राही सरनोबत

खेळाडूंना कारकीर्दीत काही वेळा धोकादायक दुखापतींना सामोरे जावे लागते.

खेळाडूंना कारकीर्दीत काही वेळा धोकादायक दुखापतींना सामोरे जावे लागते. त्यातून शंभर टक्के तंदुरुस्त होण्यासाठी मानसिक तंदुरुस्तीही आवश्यक असते. भारतासाठी नेमबाजीत पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविणाऱ्या अभिनव बिंद्रा यालाही ऑलिम्पिकपूर्वी करिअरला धोका निर्माण होणाऱ्या दुखापतीस तोंड द्यावे लागले होते. नेमबाजीत त्याला आदर्श ठेवीत अनेक खेळाडूंनी या खेळात करिअर केले. राही सरनोबत या मराठमोळ्या खेळाडूनेही त्याचाच आदर्श ठेवीत मोठय़ा हिमतीने दुखापतीस तोंड दिले! दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर तिने सर्वार्थाने सरावावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच आशियाई क्रीडा स्पर्धेत ती सुवर्णमोहोर नोंदवू शकली. आशियाई स्पर्धेतील विक्रमाबरोबरच, सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज होण्याचा मान तिने मिळविला.

हे यश तिला सहजासहजी मिळाले नाही. शेवटपर्यंत तिला तुल्यबळ प्रतिस्पध्र्याशी झुंजावे लागले. सर्वोच्च यशासाठी आवश्यक असणारी एकाग्रता तिने दाखविली, पण ‘टायब्रेकर’मध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला संयमही तिने दाखविला. जरा एकाग्रता भंग झाली, तर सुवर्णपदक गमावण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊनच तिने दाखविलेली चिकाटी, संयम व आत्मविश्वास अतुलनीय आहे.

कोल्हापूरच्या मातीमधून भारतास ज्याप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पहिलवान दिले, त्याचप्रमाणे तेजस्विनी सावंत व राही यांच्यासारखे नेमबाजही दिले आहेत. राजवर्धनसिंह राठोडच्या ऑलिम्पिक रौप्यपदकापाठोपाठ अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदकानंतर नेमबाजी हा जागतिक स्तरावर पदक मिळविण्यासाठी हुकमी क्रीडा प्रकार आहे, याची जाणीव आपल्या देशात निर्माण झाली. अखिल भारतीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धामध्ये एक हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होत असतात, हीच नेमबाजीची पावती आहे. राही हिने आशियाई स्पर्धेपूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्येही पदकांची लयलूट केली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्येही तिने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आशियाई स्पर्धेतील सोनेरी कामगिरीमुळे तिच्याकडून ऑलिम्पिक पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

First Published on August 23, 2018 2:26 am

Web Title: rahi sarnobat