News Flash

गिल्बर्ट बेकर

१९७८ साली बेकर यांनी रेनबो फ्लॅग (इंद्रधनुष्य झेंडा) बनवला. मूळच्या झेंडय़ात आठ रंग होते.

‘रेनबो फ्लॅग’चे जनक गिल्बर्ट बेकर

समलिंगींच्या प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून जगभरात मान्यता मिळालेल्या ‘रेनबो फ्लॅग’चे जनक, अमेरिकेतील कलावंत गिल्बर्ट बेकर यांचे निधन झाल्याने समलिंगी व एलजीबीटी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

गिल्बर्ट यांचा जन्म २ जून १९५१ रोजी अमेरिकेतील कॅन्सास राज्यात झाला. त्यांचे वडील न्यायाधीश तर आई शिक्षिका होती. बेकर यांनी १९७० ते १९७२ या काळात अमेरिकी लष्करात नोकरी केली. नोकरीच्या निमित्ताने ते सॅनफ्रान्सिस्को शहरात आले आणि तेथे त्यांचा समलिंगी चळवळीशी संबंध आला. राजकीय नेते आणि हत्या झालेले कार्यकर्ते हार्वे मिल्क हे बेकर यांचे निकटचे मित्र होते. सैन्यातील सेवा संपल्यानंतर त्यांनी शिवणकला शिकून घेतली आणि त्यावर आपला चरितार्थ चालू केला.

१९७८ साली बेकर यांनी रेनबो फ्लॅग (इंद्रधनुष्य झेंडा) बनवला. मूळच्या झेंडय़ात आठ रंग होते. मात्र त्यातील गुलाबी आणि टर्कोज हे रंग झेंडय़ाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करताना बाधक ठरल्याने ते नंतर वगळण्यात आले. अशा प्रकारे सुधारित रेनबो फ्लॅगमध्ये सहा रंग होते. हा झेंडा लवकरच एलजीबीटी समुदायाचे प्रतीक म्हणून मान्यता पावला. इंद्रधनुष्यातील रंग हे एलजीबीटी समुदायातील विविधतेचे प्रतीक आहेत. तसेच तो आकाशातून अवतरलेला नैसर्गिक ध्वज आहे, असे बेकर यांचे म्हणणे होते. बेकर यांच्या मूळ ध्वजातील रंगांच्या पट्टय़ा लैंगिक जीवन, आयुष्य, पीडानिवारण, प्रकाश, निसर्ग, कला, सौहार्द, प्राणतत्त्व यांचे प्रतिनिधित्व करीत होत्या. बेकर यांची कपडय़ांची नवी डिझाइन्स बनवण्यात हातोटी होती. त्याचा वापर त्यांनी एलजीबीटी चळवळीसाठी ध्वज व अन्य चिन्हे बनवण्यासाठी खुबीने केला. हा ध्वज रेनबो प्राइड म्हणून नंतर एलजीबीटी समुदायाच्या हक्कांच्या लढय़ाचे प्रतीक बनला आणि बेकर त्याचे चालतेबोलते पुरस्कर्ते बनले.  त्यानंतर १९७९ साली बेकर सॅनफ्रान्सिस्कोमधील पॅरामाऊंट फ्लॅग कंपनीसाठी काम करू लागले. तेथे त्यांनी अनेक देशांतील चळवळी, पक्ष, संघटना आदींसाठी ध्वजांचे डिझाइन व निर्मिती केली. १९९४ साली बेकर न्यू यॉर्क शहरात वास्तव्यास आले आणि अखेपर्यंत तेथेच राहिले. त्या वर्षी त्यांनी १९६९ च्या स्टोनवॉल दंगलीच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त जगातील सर्वात मोठा ध्वज बनवला होता. २००३ साली बेकर यांनी त्यांच्याच रेनबो प्लॅगच्या २५व्या वाढदिवसानिमित्त मेक्सिकोच्या आखातापासून अटलांटिक महासागरापर्यंत पसरलेला महाकाय रेनबो फ्लॅग बनवला. नंतर त्याचे तुकडे करून १०० शहरांत पाठवले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने २०१५ साली समलिंगी विवाहाला मान्यता दिली. हा विजय साजरा करण्यासाठी व्हाइट हाऊसवर बेकर यांच्या रेनबो प्लॅगच्या रंगांत विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकारांसह जगभरात विखुरलेले बेकर यांचे  मित्र व चाहत्यांनी ट्विटर, फेसबुसारख्या समाजमाध्यमांतून त्यांना आदरांजली वाहिली.   आज जगभर एलजीबीटी समुदायाच्या हक्कांना मान्यता मिळताना दिसते तेव्हा बेकर यांच्या कार्याची महती कळल्यावाचून राहत नाही..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2017 12:46 am

Web Title: rainbow flag creator gilbert baker personal information
Next Stories
1 अरुण शर्मा
2 प्रा. एच कुमार व्यास
3 अहमद कथराडा
Just Now!
X